डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात वैद्यकीय अधीक्षकांची साक्ष


पुणे :
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात ससून रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी विशेष न्यायालयात बुधवारी साक्ष दिली. डॉ. दाभोलकर यांच्या शरीरातील दोन गोळय़ा शवविच्छेदनात काढण्यात आल्या होत्या, असे त्यांनी सांगितले.

डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली होती. शवविच्छेदन ससूनचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे, डॉ. हरिश ताटिया आणि डॉ. मनोज शिंदे यांनी केले होते. त्यापैकी डॉ. तावरे यांची साक्ष केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी बुधवारी नोंदविली. डॉ. दाभोलकर यांचा मृतदेह सकाळी अकराच्या सुमारास ससून रुग्णालयातील शवागारात आणण्यात आला होता. रुग्णालयाच्या नियमानुसार दुपारी सव्वाबारापर्यंत शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. डॉ. दाभोलकर यांच्या मेंदूतून आणि छातीतून दोन गोळय़ा बाहेर काढण्यात आल्या, अशी साक्ष डॉ. तावरे यांनी नोंदविली.

बचाव पक्षाकडून अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी डॉ. तावरे यांची उलटतपासणी घेतली. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी सहा मे रोजी होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या