चिंचेचा हंगाम सुरू ; गतवर्षीच्या तुलनेत आवकही कमी


 पुणे :
स्वयंपाकघरात अढळ स्थान असलेल्या आंबट गोड चिंचेचा हंगाम सुरू झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा चिंचेचा हंगाम उशिराने सुरू झाला आहे. बाजारात होणारी चिंचेची आवक गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. किरकोळ बाजारात एक किलो चिंचेची विक्री १०० ते १५० रुपये दराने केली जात आहे.


 चिंचेचा हंगाम दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू होतो. महाशिवरात्रीनंतर चिंचेची आवक बाजारात वाढते. यंदाच्या वर्षी चिंचेचा हंगाम उशिराने सुरू झाला असून चिंचेची आवक अपेक्षेएवढी होत नसल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील चिंचेचे व्यापारी अनिल बांडे-हवालदार यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील मुळशी, वेल्हे, शिरूर, नगर, सातारा परिसरातून बाजारात चिंचेची आवक होत आहे. सध्या बाजारात दररोज दोन ते अडीच टन चिंचेची आवक होत आहे. खेड शिवापूर परिसरातील खोपी तसेच वाईमधील चिंचेची प्रतवारी उत्तम मानली जाते. बाजारात टरफल काढलेली, अखंड चिंच, चिंचुका नसलेली चिंच अशा तीन प्रकारात चिंचेची आवक होत आहे, असे त्यांनी सांगितले.


 एप्रिल महिन्यापर्यंत चिंचेचा हंगाम सुरू राहणार आहे. गेल्या वर्षीची साठवणुकीतील चिंच बाजारात मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे चिंचेचे दर स्थिर आहेत.  हवामान बदलामुळे यंदा चिंचेचा हंगाम उशिराने सुरू झाला असून दरवर्षी साधारणपणे मार्केट यार्डातील बाजारात पाच ते दहा टन चिंचेची आवक व्हायची. यंदाच्या हंगामात चिंचेची आवक कमी प्रमाणावर होत असल्याचे त्यांनी सांगितले.


चिंच बाजारातून राज्यासह परराज्यात विक्री


नगर जिल्ह्यातील सुपे, बारामती मोरगाव तसेच बार्शी परिसरात चिंच बाजार आहेत. या बाजारात शेतकरी चिंच विक्रीस पाठवितात. तेथून राज्याच्या वेगवेगळय़ा भागात चिंच विक्रीस पाठविली जाते. चांगली प्रतवारी असलेली चिंच टिकाऊ असते. चिंचेची साठवणूक शीतगृहात करण्यात येते. शीतगृहातील चिंच तीन ते चार वर्षे टिकते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या