पुणे : पुण्यात रस्त्यात थुंकल्याने झालेल्या वादातून एकावर तलवारीने वार केल्याचा प्रकार घडला. यानंतर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी सहा जणांना १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. रफिक उमर शेख (वय ३८), फिरोज गुलाम हुसेन (वय ३३), अफजल उमर शेख (वय ३४), मुद्दसर उर्फ सोनू साबीर खान (वय ३१), मुन्वर उर्फ मोनू साबीर शेख (वय ३१), सद्दाम उमर शेख (वय ३१, सर्व रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत.
न्यायालयाने आरोपींना नऊ हजार ३०० रुपयांचा दंड ठोठावला असून दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. गोवर्धन खुडे यांनी या संदर्भात स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
नेमकं काय घडलं होतं?
गुलटेकडीतील डायस प्लॉट वसाहतीत २१ ऑक्टोबर २०११ रोजी आरोपी अफजल शेख हा व्यक्ती रस्त्यात थुंकला. त्यावेळी खुडे आणि त्यांचा मामेभाऊ कृष्णा लोंढे यांनी शेखकडे रस्त्यात का थुंकलास? अशी विचारणा केली. या कारणावरुन शेख आणि त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर शेखने साथीदारांना बोलावून घेतले. तलवारीने खुडे यांच्यावर वार केले तसेच लोंढे यांना दांडके, गजाने मारहाण केली.
या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील ॲड. मारुती वाडेकर यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने सहा आरोपींना १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
0 टिप्पण्या