छोटय़ा-छोटय़ा आघाडीच्या प्रयोगाने भाजपला रोखणे शक्य! ; योगेंद्र यादव यांचा दावा

 पुणे :
देशातील सरकारकडून राज्यघटनेची हत्या होत असून प्रजासत्ताकाला कमकुवत केले जात आहे. २०२४ ची निवडणूक देशाची वाटचाल स्पष्ट करणारी असेल.  भाजपला पराभूत करण्याचे काँग्रेस किंवा विश्वासार्हता गमावलेल्या विविध पक्षांच्या महाआघाडीला शक्य नाही. त्यापेक्षा छोटय़ा छोटय़ा आघाडीचा प्रयोग करून भाजपला रोखणे शक्य आहे, असा दावा स्वराज अभियानचे प्रमुख आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी केला.

भाजपच्या ट्रोल आर्मीविरोधात ट्रुथ आर्मी म्हणजेच सत्यशोधकांची फौज निर्माण करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.

आकलन संस्थेतर्फे प्रा. राजेंद्र व्होरा स्मृती व्याख्यान पुष्प योगेंद्र यादव यांच्या व्याख्यानाने गुंफले गेले. ‘२०२४ की चुनौती और गणतंत्र बचाने की राह’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सुहास पळशीकर यांनी यादव यांचा सत्कार केला.


यादव म्हणाले, उत्तर प्रदेशचे निकाल आल्यानंतर मी निराश होतो. पश्चिम बंगालच्या निकालांनी खिडकी उघडली गेली. मात्र, शेतकरी आंदोलनानंतर आता पूर्ण दरवाजा उघडू शकतो याचा विश्वास आला आहे. आपल्या लोकशाहीला धोका निर्माण झाला असून उत्तर प्रदेशात केवळ राजकीय पक्ष नाही तर आपण सारे पराभूत झालो आहोत असे त्यांनी नमूद केले.


योगेंद्र यादव म्हणाले..


* सध्याचा काँग्रेस पक्ष अवकाश भरून काढू शकत नाही.


* गुजरातमध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजप नाही तर काँग्रेस हाच आपचा प्रमुख विरोधक असेल.


* हिंदी पट्टय़ातील राज्यांमध्ये दोनशेपैकी सव्वाशे जागांपर्यंत रोखता आले तरी भाजप सत्तेतून बाहेर पडू शकेल.


..तीन कायदे चोरदरवाजाने येण्याची शक्यता


केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने मागे घेतलेले तीन कायदे चोरदरवाजाने पुन्हा लागू होण्याची शक्यता योगेंद्र यादव यांनी सोमवारी व्यक्त केली. असे होऊ नये यासाठी देशभर जनजागृती करणात येत असल्याने त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या