राळेगणसिद्धीत जमावबंदी, कार्यकर्त्यांच्या उपोषणामुळे अण्णांच्या सुरक्षेला धोका?

 अहमदनगर:
पारनेर तालुक्यातील टँकर गैरव्यवहार प्रकरणी तालुक्यातील एका संस्थेतर्फे राळेगणसिद्धीत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोमवारपासून (११ एप्रिल) राळेगणसिद्धीत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. उपोषणामुळे गावात संघर्ष निर्माण होऊन हजारे यांच्या सुरक्षाव्यवस्थेला धोका पोहचू शकतो, त्यामुळे हा आदेश देण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. 

लोकजागृती सामाजिक संस्थेचे रामदास घावटे आणि बबनराव कवाद यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. या गैरव्यवहारात अडकलेल्या कंपनीचे काही पदाधिकारी राळेगणसिद्धीचे आहेत. त्यांच्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि ग्रामसभेने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र, या खासगी कंपनीशी हजारे आणि ग्रामपंचायतीचा काहीही संबंध नसल्याचे सांगत उपोषण करण्यास ग्रामपंचायतीने परवानगी नाकारली आहे. तरीही आंदोलक ठाम असल्याने प्रशासनाने हजारे यांच्या सुरक्षेचे कारण सांगत जमावबंदीचा आदेश दिला आहे.

हजारे यांना झेड दर्जाची सुरक्षा असल्यामुळे व उपोषणकर्ते हजारे यांच्याशी संबंधित विषयावर उपोषण करत असल्यामुळे येथे कायदा-सुव्यवस्था व हजारे यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. असे कारण देवून राळेगणसिद्धीत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. पारनरेचे उपविभागीय दंडाधिकारी सुधाकर भोसले यांनी हा आदेश दिला.


जमावबंदी लागू केली असली तरी आम्ही उद्या राळेगणसिद्धीत प्रवेश करून यादवबाबा मंदिरात शांततेच्या मार्गाने उपोषण करणार आहोत. आम्ही तेथे कायदा-सुव्यवस्था, शांतता पाळून व अण्णांच्या सुरक्षेला बाधा न होता आंदोलन करणार आहेत, असे रामदास घावटे यांनी सांगितले.


गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद सुरू आहे. संस्थेने उपोषणाचा इशारा दिल्यानंतर राळेगणसिद्धीच्या ग्रामपंचायतीने पत्र लिहून उपोषणास परवानगी नाकारली आहे. पत्रात म्हटले आहे की, स्वत: हजारे आणि राळेगणसिद्धी ग्रामपंचायत गैरकामे करणाऱ्यांना कधीही पाठीशी घालत नाही. ज्या प्रकरणी आपण उपोषणाचा इशारा देत आहात, त्यामध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यांचा तपास सुरू आहे. जे कोणी दोषी आढळतील, त्यांना पाठीशी घातले जाणार नाही. मात्र, आपले यासंबंधीचे पत्र वाचल्यावर हेतूबद्दल शंका येते. मुळात आमच्या गावाने ग्रामसभा घ्यावी, त्यात काय ठराव करावेत, वगैरे सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही. हे लोकशाहीवरील अतिक्रमण आहे. ज्या संस्थेबद्दल आपण तक्रार केली आहे, त्यातील एक संचालक तुमच्याच निघोज गावातील आहे. त्यामुळे आपण त्या गावाला अशी सूचना केल्याचे ऐकिवात नाही. राळेगणसिद्धी किंवा हजारे यांचे नाव आले की प्रसिद्धी मिळते, त्यामुळे तुम्ही राळेगणसिद्धी परिवाराला लक्ष्य करीत आहात. ती कंपनी खासगी आहे, त्यांच्या संचालकांचे राजीनामे घ्यायचे किंवा कसे, हे संस्था ठरविणार. ही मागणी ग्रामस्थांकडे करणे हस्यास्पद आहे. मूळ तक्रारीवर गुन्हा दाखल झाला आहे. त्या कायदेशीर प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला नाही. त्यामुळे आपली मागणी मान्य करता येणार नाही. आपण पत्रात नमूद केल्याप्रमाणे खासगी प्रश्नावर उपोषण करायचे असेल तर ते शासन दरबारी करावे. राळेगणसिद्धी गावात या मागणीसाठी कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यास परवानगी देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी, असेही सरपंच लाभेश औटी यांनी पत्रात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या