‘मनसे’ची आणखी एक घोषणा; अक्षय्य तृतीयेला लाऊडस्पीकर लावून राज्यभरातील मंदिरामध्ये ‘महाआरती’ करणार!


महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरून केलेल्या सभेतून आणि त्यानंतर ठाणे येथील उत्तर सभेमधून मशिदींवरील भोंग्यासंदर्भात दिलेल्या अल्टिमेटमनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवाय, यावरून मोठ्याप्रमाणावर आरोप-प्रत्यारोप देखील सुरू झाले आहेत. सर्वच पक्षातील नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील पत्रकारपरिषदेत बोलताना दोन मोठ्या घोषणा केल्या होत्या.”५ जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह मी अयोध्येला जाणार आहे आणि महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहे.” असं ते म्हणाले होते. यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं असतानाच, आता मनसेकडून आणखी एक घोषणा करण्यात आली आहे.
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यभरातील मंदिरामध्ये मनसे कार्यकर्ते महाआरती करणार आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी ही माहिती दिली आहे.

”महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते ३ मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यभरात त्यांच्या स्थानिक मंदिरांमध्ये ‘महाआरती’ करतील. लाऊडस्पीकरचा वापरून करून ही महाआरती केली जाईल.” असे सरदेसाई यांनी सांगितले आहे.

मनसेच्या या नव्या घोषणेमुळे आता राजकीय वातावरण आणखीच तापणार असल्याचे दिसत आहे. शिवाय, महाविकास आघआडी सरकार आणि प्रशासन देखील आता काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मशिदींवरील भोंगे न काढल्यास, त्याच्यासमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेले आहे. यावरून सध्या वातावरण तापलेले असताना. हनुमान जयंतीनिमित्त पुण्यातील कुमठेकर रोडवरील खालकर मारुती मंदिर येथे मनसेकडून सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम देखील घेण्यात आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या