कोव्हिड सेंटरमधील साहित्याची चौकशी सुरू


 कोव्हिड केअर सेंटरमधील कोट्यवधी रुपयांचे साहित्य गायब झाल्याप्रकरणी आता महापालिकेच्या आरोग्य विभागाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. कोणत्या कोव्हिड केअर सेंटरसाठी किती आणि कोणकोणत्या प्रकारचे साहित्य मागवण्यात आले होते, याची यादी चौकशी अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रांकडून मागवली आहे.


करोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत महापालिकेने शासनाच्या निर्देशानुसार कोव्हिड केअर सेंटर, क्वारंटाइन सेंटर सुरू केले होते. त्यांची संख्या सुमारे बावीस होती. प्रत्येक कोविड केअर सेंटर व क्वारंटाइन सेंटरसाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन आवश्यक साहित्य खरेदी करण्यात आले होते. त्यात पलंग, गाद्या, उशा, बेडशिट, पिलोकव्हर, साबण, तेल, कंगवा, आरसा, कुलर, टीव्ही, आयुर्वेदिक काढ्यासाठीचे मशीन अशा साहित्याचा समावेश होता. करोना संसर्गाची पहिली लाट ओसरल्यावर यातील काही साहित्य गायब झाले. मात्र, प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. करोनाची दुसरी आणि तिसरी लाट संपल्यावर पालिका प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. कोव्हिड केअर सेंटर व क्वारंटाइन सेंटरमधील साहित्य गायब झाल्याचे लक्षात आले. काही दिवसांपूर्वी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आढावा बैठक घेतली तेव्हा कोविड केअर सेंटर व क्वारंटाइन सेंटरमधील साहित्य गायब झाल्याची बाब उघड झाली. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपायुक्त सौरभ जोशी यांना दिले.


चौकशी संदर्भात सौरभ जोशी यांना विचारले असता ते म्हणाले, 'चौकशीचे काम सुरू करण्यात आले आहे. कोणत्या कोव्हिड केअर सेंटरला आणि क्वारंटाईन सेंटरला किती आणि कोणत्या प्रकारचे साहित्य देण्यात आले होते याची यादी आरोग्य विभागाकडून मागवली आहे. प्राप्त होणाऱ्या यादींनुसार चौकशी केली जाणार आहे. लवकरात लवकर चौकशी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.'


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या