रणजीच्या बाद फेरीच्या ठिकांणांबाबत चर्चा ; ‘बीसीसीआय’च्या कार्यकारी परिषदेची बैठक २३ एप्रिलला

 नवी दिल्ली :
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यकारी परिषदेची २३ एप्रिलला बैठक होणार असून यात रणजी करंडक स्पर्धेच्या बाद फेरीच्या ठिकाणांबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे.


यंदा रणजी करंडक स्पर्धा दोन टप्प्यांमध्ये खेळवली जात आहे. पहिल्या टप्प्यात साखळी फेरीचे सामने झाले. त्यानंतर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमुळे रणजी स्पर्धा थांबवण्यात आली. आता रणजीच्या ३० मे ते २६ जून या कालावधीत होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात बाद फेरीचे सामने खेळवण्यात येतील. त्यामुळे ‘बीसीसीआय’च्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत बाद फेरीच्या आठ सामन्यांसाठीची ठिकाणे निश्चित होणे अपेक्षित आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ ९ जूनपासून पाच सामन्यांची ट्वेन्टी-२० मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. तसेच जून महिन्यात भारतामध्ये पावसालाही सुरुवात होते. त्यामुळे रणजी स्पर्धेच्या बाद फेरीची ठिकाणे ठरवताना ‘बीसीसीआय’ला विविध गोष्टींचा विचार करावा लागेल.


तसेच या बैठकीत विविध स्थानिक क्रिकेट स्पर्धाच्या आयोजनाचे शुल्क, तसेच ‘बीसीसीआय’शी संलग्न राज्य संघटनांना विविध स्पर्धामधील सहभागाचे शुल्क देण्याबाबतही चर्चा केली जाणार आहे.


त्याचप्रमाणे भारताचा अनुभवी यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने मुलाखतीसाठी नकार दर्शवल्यानंतर एका वरिष्ठ पत्रकाराने त्याला धमकावले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ‘बीसीसीआय’ने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाचाही कार्यकारी परिषदेच्या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या