जेव्हा भुकेने व्याकूळ झालेल्या वरुण धवनसाठी दिव्या भारतीने बनवले होते ऑम्लेट


 नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन हा अतिशय लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. वरुणने २०१२ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. वरुणने स्वबळावर सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विनोदी अंदाज, नृत्यकौशल्य आणि इंडस्ट्रीत सर्वांशी मिळतंजुळतं यामुळे त्याची सर्वत्र चर्चा असते. सध्याच्या घडीला बी- टाऊनमधील काही प्रसिद्ध चेहऱ्यांमध्ये गणला जाणारा अभिनेता म्हणून त्याला ओळखले जाते. आज वरुण धवनचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्ताने त्याच्या आयुष्यातील एक मजेशीर किस्सा आपण जाणून घेणार आहोत.


वरुणने २०१२ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केले असेल तरी त्याच्या कुटुंबात चित्रपटसृष्टीतील वातावरण होते. वरुण धवनचे वडील डेव्हिड धवन हे एक प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत, तर भाऊ रोहित धवन हा दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत. वरुण धवन हा अनेकदा वडिलांसोबत चित्रपटांच्या सेटवर जायचा. त्यामुळे बालपणीपासूनच तो अनेक अभिनेते- अभिनेत्रींसोबत गप्पा मारायचा. त्याचे अनेक मजेशीर किस्सेही समोर आले आहेत. नुकतंच एका मुलाखतीत त्याने दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीसोबतचा एक किस्सा सांगितला आहे.

वरुण धवनने २०१९ मध्ये ‘बॉलिवुड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने दिव्या भारतीसोबतची एक आठवण सांगितली होती. त्यावेळी तो म्हणाला होता की, “१९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शोला और शबनम’ चित्रपटाच्या सेटवरील एक गोष्ट मला अजूनही आठवते. मी अनेकदा माझ्या वडिलांसोबत चित्रपटाच्या सेटवर जायचो. त्यावेळी दिव्या भारती आणि गोविंदा यांच्या शोला आणि शबनम चित्रपटाची शूटींग सुरु होती. मी त्यावेळी फक्त ४ वर्षांचा होतो. मला फार भूक लागली होती आणि मी रडत होतो. त्यावेळी दिव्या भारतीने मला ऑम्लेट बनवून खायला दिले होते.”


यावेळी एका चाहत्याने वरुणला प्रश्न विचारला होता की ‘तुला ८० ते ९० दशकातील कोणत्या अभिनेत्रींसोबत काम करायला आवडेल?’ त्यावर उत्तर देताना वरुण धवनने लगेचच दिव्या भारती हे नाव घेतलं. “मला इतर अभिनेत्रींपेक्षा दिव्या भारतीसोबत काम करायला आवडले असते. तिच्यासोबत काम करताना फार मजाही आली असती.”

“त्यानंतर त्याने करिश्मा कपूर आणि जुही चावला या दोघींचे नाव घेतले. करिश्मा कपूर ही माझी आवडती अभिनेत्री आहे. तर जुही चावला हिची कॉमेडी मला फार आवडते.” असेही त्याने म्हटले होते. दरम्यान वरुण धवनचा अभिनय क्षेत्रातील प्रवास फारच रंजक आहे. प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मुलगा असूनही त्याला चित्रपटातील भूमिका मिळवण्यासाठी ऑडिशन्स द्याव्या लागल्या होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या