कुरिअरने बनावट नाव, पत्त्याद्वारे १० तलवारी मागवणाऱ्यासह दोन खरेदीदारांना अटक


 औरंगाबादेत डिटीडीसी कुरिअरव्दारे ३१ तलवारी व १ कुकरी मागवल्याच्या प्रकरणात एका तरुणाने बनावट नाव व पत्ता नोंदवून १० तलवारी खरेदी करून त्यातील काही इतर दोघांना विक्री केल्याचा प्रकार तपासात पुढे आल्याची माहिती क्रांती चौक पोलीस  ठाण्याचे निरीक्षक डॉ. जी. एस. दराडे यांनी रविवारी रात्री दिली. शेख अबरार शेख जमील उर्फ शाहरूख (वय २१, जयसिंगपुरा रोड, बेगमपुरा), असे आरोपीचे नाव आहे.  अबरार याने मित्राच्या नावाने सिमकार्ड खरेदी करून शेख राजू, निना फंक्शन हॉल, असे बनावट नाव व पत्ता नोंदवला होता. त्या आधारे १० तलवारी मागवल्या होत्या. अबरार याला विचारपूस केली असता १ तलवार घरात तर दोन तलवारी विक्री केल्याचे त्याने कबूल केले. पैकी एक तलवार त्याच्या घरातून व अन्य दोन तलवारी या शेख उबेद शेख नजीर (वय २०, अरब खिडकी परिसर) व दानिश खान अब्दुल समद खान यांच्याकडून प्रत्येकी १ अशा एकूण ३ तलवारी जप्त करण्यात आल्या. अबरार, उबेद व दानिश खान, या तिघांनाही अटक करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक डॉ. दराडे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या