जेम्स लेन यांनी पुरंदरेंशी चर्चा झाली नसल्याचा खुलासा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया

 “आम्ही काय वेडे…”


महाराष्ट्रात सध्या पुन्हा एकदा जेम्स लेन यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकावरुन वाद निर्माण झाला असून यानिमित्ताने मनसे आणि राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरेंनीच जेम्स लेनला वादग्रस्त पुस्तकासाठी माहिती दिली असा आरोप केला आहे. तर राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जातीचं राजकारण केल्याचा आरोप करत बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट असल्याचा आरोप केला आहे. त्यातच स्वत: लेख जेम्स लेनने या वादावर भाष्य केलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बाबासाहेब पुरंदरे आपल्या माहितीचे स्त्रोत नव्हते असं सांगितलं आहे.

जेम्स लेन यांनी बाबासाहेब पुरंदरेंशी कोणतीच चर्चा झाली नसल्याचा दावा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एबीपी माझाशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. २० वर्ष हा कुंभकर्ण झोपला होता का? अशी विचारणा जितेंद्र आव्हाड यांनी केली असून हे कोण मॅनेज करतंय मला माहिती नाही असं सूचक विधानही केलं आहे.


पुस्तकातील वादग्रस्त माहिती तुम्हाला कोणी पुरवली याबद्दल विचारलं असता जेम्स लेन यांनी सांगितलं की, “तुम्ही हा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारत आहात. कोणीही मला माहिती पुरवली नाही. माझं पुस्तक कथा आणि लोक ते कसं सांगतात; त्या कथा सांगणाऱ्या लोकांच्या मूल्यांबद्दल आपल्याला काय कथा सांगतात याबद्दल होतं. उदाहरणार्थ…काही लोक शिवाजी महाराजांचा संबंध रामदास गुरुंसोबत जोडतात तर काहीजण तुकाराम महाराजांसोबत. यापैकी कोणती माहिती योग्य आहे आणि एक गट ‘अ’ कथानकाला का पसंती देतो आणि दुसरा गट ‘ब’ ला का यात मला रस नाही”.


तुम्हाला मिळालेल्या माहितीचा आधार काय होता? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “जो कोणी माझं पुस्तक नीट वाचेल त्याला मी कोणताही ऐतिहासिक दावा करत नसल्याचं लक्षात येईल. मी शिवाजी महाराजांचा अपमान केला अशी टीका करणाऱ्यांनी नीट वाचलेलं नाही. पुन्हा सांगतो की मी फक्त कथा सांगतो, ऐतिहासिक तथ्य नाही”.


तुम्ही कधी बाबासाहेब पुरंदरेंसोबत चर्चा केली केली का? आणि केली तर त्यांचा प्रतिसाद कसा होता? असं विचारण्यात आलं असता जेम्स लेन यांनी आपली कधीच एका शब्दानेही त्यांच्याशी चर्चा झाली नसल्याचं सांगितलं.


जेव्हा तुम्हाला त्या टिप्पणीबद्दल खेद वाटला आणि ते परत घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तुमच्या मनात काय चालले होते? असं विचारलं असता ते म्हणाले की, मी माझे युक्तिवाद करताना अधिक सावधगिरी बाळगली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून इतरांना त्रास सहन करावा लागला याची खंत होती.


बाबासाहेब पुरंदरे तसंच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती केलेल्या योगदानाकडे कसं पाहता? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “पुरंदरे हे एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात प्रख्यात समर्थक होते आणि त्याबद्दल ते बराच काळ आदरणीय होते. 18 व्या आणि 19 व्या शतकातील राजकीय लिखाणावरुन आज त्यांच्यावर टीका केली जात आहे, जेव्हा शिवाजी महाराजांच्या वंशजांना काही ब्राह्मणांनी खरे क्षत्रिय मानण्यास नकार दिला होता. त्यानंतरच मराठा आणि ब्राह्मण इतिहासाच्या लेखनात वाद निर्माण झाला”.


जवळपास दीड दशकांनंतरही पुस्तकाबाबतच्या वादग्रस्त बातम्या वाचून तुम्हाला काय वाटतं? अशी विचारणा केली असता ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे महान वीर होते. पण मला खेद वाटतो की त्यांचे चरित्र हा विद्वत्तेचा विषय नसून समकालीन राजकीय वादाचं साधन झालं आहे”.

“आरोप करायचा, मग दुसऱ्या दिवशी पत्रक काढायचं, हे कोण मॅनेज करतंय मला माहिती नाही. जेम्स लेनची सुरुवात कोणी केली सर्वांना माहिती आहे, पण नाव घ्याचं नाही,” असं यावेळी ते म्हणाले,


“पत्रकारांचंही आश्चर्य वाटतं. त्यांना २० वर्षांनी जेम्स लेन सापडला. महाराष्ट्र भूषण झाला तेव्हा वाद झाला, २००३ ला पुस्तक आलं तेव्हा जेम्स लेन नाही सापडला. या महाराष्ट्रात शोधपत्रकारिता करत असलेल्या काही मोठ्या पत्रकारांना आता जेम्स लेन सापडला. म्हणजे महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण करण्याचा हा किती मोठा कट आहे याचं उत्तम उदाहरण आहे. ज्या पत्रकाराने मुलाखत घेतली त्यांनी कोणत्या आधारे लिहिलं हे विचारावं आणि हे काढत का नाही विचारावं. जे घाणेरडं लिहिलं आहे ते काढू टाका असं सांगा,” अशी मागणी आव्हाडांनी यावेळ केली.


स्वत: पुरंदरे यांनीच लिहिलं आहे यामुळे हा संबंध येतो असंही ते म्हणाले. “मीदेखील इतिहासाचा अभ्यासक आहे. २० वर्षांनी पत्रकार शोधतात, मग तो सापडतो, मुलाखत घेतो. आम्ही काय वेडे म्हणून जन्माला आलोत का? याआधी जेम्स लेनला मातीत गाडलं होतं का? बाबासाहेबांच्यां मृत्यूनंतर तो बाहेर येतो,” असे अनेक प्रश्न आव्हाडांनी विचारले आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसोबत मस्ती करु नका परिणाम गंभीर होतील असा इशारा दिला होता याची आठवण आव्हाडांनी यावेळी करुन दिली.


“बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यांनी चुकीचा इतिहास सांगितला म्हणे. पण कोणत्या पानावर सांगितला ते तर सांगा. यांचे इतिहासकार कोण? तर कोकाटे. महाराजांवर आजपर्यंत रणजित देसाईंनी लिहिलं, संभाजी महाराजांवर बाबासाहेबांनी, मेहेंदळेंनी लिहिलं. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने शिवाजी महाराज लोकांपर्यंत आणले. पण बाबासाहेब पुरंदरेंमुळे घराघरात शिवाजी महाराज पोहोचले. पण आम्हाला इतिहास बघायचा नाही. आम्हाला ते पुस्तक कोणत्या जातीच्या माणसानं लिहिलंय, ते बघायचंय. आम्ही छत्रपतींचा इतिहास सांगणार नाही. आम्ही मराठेशाहीचा इतिहास सांगताना त्यात फोड करणार की पेशव्यांनी केलेली गोष्ट वगैरे. शरद पवार साहेब, काय चाललंय? तुमच्यासारख्या बुजुर्ग माणसानं या महाराष्ट्रातला जातीपातीचा भेद गाडून टाकला पाहिजे. तुम्ही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण तुमच्या राजकीय स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी सुरु आहेत,” असा आरोप राज ठाकरेंनी केला होता.


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास वेगळय़ा दिशेने नेण्याचा प्रयत्न केला होता. शिवाजी महाराजांना जिजामातांनी घडविले. पण, त्यांना दादोजी कोंडदेव यांनी घडविले, असं पुरंदरे यांनी लिहून ठेवलं होतं. जेम्स लेनने शिवाजी महाराजांबद्दल जे गलिच्छ लिखाण केले त्याची माहिती बाबासाहेब पुरंदरे यांनी पुरविली होती, असा उल्लेख लेनच्या पुस्तकात आहे. त्यावर पुरंदरे यांनी कधी खुलासा केला नव्हता. यातूनच मी पुरंदरे यांच्यावर टीकाटिप्पणी केली होती व त्याबद्दल मला अभिमान आहे, असं शरद पवार यांनी म्ह़टलं होतं.


यानंतर मनसेने २००३ साली बाबासाहेब पुरंदरे आणि देशातील इतर नामांकित इतिहासकारांनी लिहिलेलं एक पत्रच जाहीर करत शरद पवारांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या