अग्रस्थानासाठी चुरस! ;गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज सामना


 इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट:

नवी मुंबई

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गुरुवारी होणाऱ्या सामन्यात दर्जेदार गोलंदाजांचा कस लागणार आहे.या दोन्ही संघांनी चार सामन्यांपैकी तीन विजय मिळवले आहेत. त्यामुळे विजयी संघ गुणतालिकेत अग्रेसर होऊ शकेल. राजस्थानचा एकमेव पराभव बंगळुरुविरुद्ध झाला आहे, तर गुजरातने फक्त हैदराबादविरुद्ध सामना गमावला आहे.

• वेळ : सायं. ७.३० वा.

• थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, १ हिंदूी, सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्या)

बटलर, चहलवर भिस्त

राजस्थानच्या फलंदाजीची धुरा जोस बटलरवर (४ सामन्यांत २१८) आहे. शिम्रॉन हेटमायर (४ सामन्यांत १६८) चौफेर आतषबाजी करीत धावफलकाला वेग देत आहे. देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार संजू सॅमसन हे दोघे सातत्यपूर्ण फलंदाजी करीत आहेत. राजस्थानकडे वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा योग्य समतोल साधण्यात आला आहे. फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलवर राजस्थानच्या फिरकीची मदार आहे. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ११ बळी त्याच्या खात्यावर आहेत. अनुभवी रविचंद्रन अश्विनची त्याला पुरेशी साथ मिळत आहे. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (एकूण ७ बळी) प्रतिस्पर्धी संघांसाठी घातक ठरत आहेत. प्रसिध कृष्णा वेग आणि आक्रमकतेचा अचूक समन्वय साधत गोलंदाजी करीत आहे. लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी १५ धावांची आवश्यकता असताना कुलदीप सेनने टिच्चून गोलंदाजी करीत संघाला विजय मिळवून दिला.

वेड, मिलरची चिंता

नवख्या गुजरातच्या फलंदाजीची भिस्त युवा सलामीवीर शुभमन गिल (४ सामन्यांत १८७ धावा) आणि कर्णधार हार्दिक पंडय़ावर (४ सामन्यांत १४१ धावा) आहे. मॅथ्यू वेड धावांसाठी झगडत आहे, तर डेव्हिड मिलरचा खेळही अपेक्षेनुसार उंचावलेला नाही. अभिनव मनोहर आणि बी. साई सुदर्शन यांनी जबाबदारीने खेळ करण्याची गरज आहे. राहुल तेवतिया मात्र विजयवीराची भूमिका चोख बजावत आहे. जागतिक क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक गणला जाणारा लॉकी फग्र्युसन, मोहम्मद शमी, पंडय़ा असा वेगवान मारा गुजरातकडे आहे. फिरकी गोलंदाज रशीद खान हा त्यांचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. रशीदच्या चार षटकांत प्रतिस्पर्धी फलंदाजांची कोंडी होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या