‘मार्क्‍सवाद: फुले-आंबेडकरवाद’च्या अनुवादासाठी राहुल सरवटे यांना अधिछात्रवृत्ती


पुणे :
न्यू इंडिया फाउंडेशनतर्फे ‘एनआयएफ भाषांतर अधिछात्रवृत्ती’च्या पहिल्या फेरीसाठी बंगाली, कन्नड आणि मराठी या तीन भाषांतील चिंतनशील पुस्तकांची इंग्रजी भाषांतरासाठी निवड करण्यात आली आहे. मराठी भाषेतील शरद पाटील यांच्या ‘मार्क्‍सवाद : फुले-आंबेडकरवाद’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी इतिहास अभ्यासक राहुल सरवटे यांना सहा लाख रुपयांची अधिछात्रवृत्ती जाहीर झाली आहे.


भारतीय भाषांतील चिंतनशील लेखनाच्या इंग्रजी अनुवादास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘एनआयएफ भाषांतर फेलोशिप’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अधिछात्रवृत्तीच्या प्रत्येक पुरस्कारार्थी गटाने सहा महिन्यांत पुस्तक अनुवाद पूर्ण करावयाचा असून त्यासाठी सहा लाख रुपये अधिछात्रवृत्ती देण्यात येते. मुख्य म्हणजे पुरस्कारार्थीना अनुवाद प्रक्रियेमध्ये न्यू इंडिया फाउंडेशनचे विश्वस्त आणि भाषातज्ज्ञांची समिती यांच्या थेट मार्गदर्शनाची संधी मिळणार आहे.

तज्ज्ञांच्या निवड समितीने दहा प्रादेशिक भाषांतील अनुवादक-अभ्यासकांमधून निवड केली. निवड समितीमध्ये राज्यशास्त्राच्या अभ्यासक नीरजा गोपाल जयाल, इतिहासकार श्रीनाथ राघवन, उद्योजक मनीष सभरवाल या फाउंडेशनच्या विश्वस्तांसह डॉ. सुहास पळशीकर (मराठी), कुलधर सैकिया (आसामी), इपशिता चांद (बंगाली), त्रिदीप सुहृद (गुजराती), हरीश त्रिवेदी (हिंदी), विवेक शानभाग (कन्नड) राजन गुरुक्कल (मल्याळम), जतीन नायक (ओडिया), ए. आर. वेंकटचलपती (तमीळ) आयमा किदबइ आणि राणा सफ्वी (उर्दू) या तज्ज्ञांचा समिती सदस्यांमध्ये समावेश होता.


तीन भाषेतील पुस्तकांची निवड


मराठी भाषेतील शरद पाटील यांच्या ‘मार्क्‍सवाद : फुले-आंबेडकरवाद’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी इतिहास अभ्यासक राहुल सरवटे यांची निवड

बंगाली भाषेतील निर्मलकुमार बोस यांच्या ‘निर्मलकुमार डायरी १९४६-४७’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी साहित्य अनुवादक रामास्वामी आणि संख्याशास्त्रज्ञ अम्लान विश्वास यांची निवड

कन्नड भाषेतील डी. आर. नागराज लिखित ‘अल्लमप्रभू मत्तु शैवे प्रतिभा’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी साहित्येतर अभ्यासक एन. एस. गुण्डूर यांची निवड

मराठी भाषेतून अनुवादासाठी गेल्या शंभर वर्षांत प्रकाशित झालेल्या पुस्तकांचे २७ प्रस्ताव आले होते. त्यातून स्वातंत्र्योत्तर काळात स्वतंत्रपणे मांडणी झालेल्या शरद पाटील यांच्या ‘मार्क्‍सवाद : फुले-आंबेडकरवाद’ या पुस्तकाची निवड झाली आहे. या विषयावर मराठीतून काय विचार करून मांडणी केली गेली, हे बिगरमराठी वाचकांपर्यंत पोहोचावे हा त्यामागचा उद्देश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या