कोहलीला सूर गवसणार?


 आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु-राजस्थान रॉयल्स आमनेसामने

मुंबई : सलग तिसऱ्या विजयासाठी उत्सुक राजस्थान रॉयल्स संघाचा मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाशी सामना होणार आहे. या सामन्यात बंगळूरुचा प्रमुख फलंदाज विराट कोहलीला सूर गवसतो का, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.


 बंगळूरुला यंदाच्या मोसमाच्या सलामीच्या लढतीत पंजाब किंग्जने पराभूत केले होते. मात्र, पुढील सामन्यात त्यांनी कोलकाता नाइट रायडर्सला पराभूत करत हंगामातील पहिला विजय मिळवला. त्यामुळे वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात राजस्थानला नमवत सलग दुसरा विजय मिळवण्याचा बंगळूरुचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानने सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सविरुद्धचे आपले पहिले दोन सामने जिंकत यंदा जेतेपदासाठी दावेदार असल्याचे दाखवून दिले. या संघात आघाडीच्या भारतीय खेळाडूंसह अनुभवी परदेशी खेळाडूंचा समावेश असून त्यांनी दोन्ही सामन्यांत छाप पाडली आहे.


’ कोहली, फॅफवर मदार


माजी कर्णधार कोहलीने पंजाबविरुद्धच्या पहिल्या सामन्यात नाबाद ४१ धावांची खेळी केली. मात्र, कोलकाताविरुद्ध दुसऱ्या सामन्यात तो केवळ १२ धावा करून बाद झाला. कोहलीला गेल्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही धावांसाठी झगडावे लागत आहे. मात्र, वानखेडेच्या फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर तो मोठी खेळी करण्यासाठी उत्सुक असेल. फलंदाजीत त्याच्यासह कर्णधार फॅफ डय़ूप्लेसिसवर बंगळूरुची मदार आहे. अनुभवी दिनेश कार्तिक विजयवीराची भूमिका बजावेल. गोलंदाजीत पुन्हा श्रीलंकन फिरकीपटू वािनदू हसरंगाच्या कामगिरीवर सर्वाची नजर असेल. तसेच  मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल हेसुद्धा  महत्त्वाची भूमिका बजावतील.


’ तारांकितांची दमदार कामगिरी


राजस्थानच्या जोस बटलर, कर्णधार संजू सॅमसन, रविचंद्रन अश्विन आणि यजुवेंद्र चहल यांसारख्या तारांकित खेळाडूंनी पहिल्या दोन सामन्यांत अप्रतिम कामगिरी केली आहे. बटलरने मुंबईविरुद्ध गेल्या सामन्यात शतकी खेळी केली. त्याला सॅमसन आणि अखेरच्या षटकांत शिम्रॉन हेटमायर यांची साथ लाभली. यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडिक्कल या युवा डावखुऱ्या फलंदाजांच्या कामगिरीत मात्र सुधारणा गरजेची आहे. गोलंदाजीत अश्विन आणि लेग-स्पिनर चहल या फिरकी जोडीने पहिल्या दोन सामन्यांत तीन-तीन बळी मिळवले. आता त्यांचे बंगळूरुच्या फलंदाजांना रोखण्याचे लक्ष्य असेल. वेगवान गोलंदाजीची धुरा प्रसिध कृष्णा आणि ट्रेंट बोल्ट सांभाळतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या