Breaking News

“शरद पवारांना जातीयवादी म्हणणारे राज ठाकरे…”; अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

 “टीका आणि नकला करण्याशिवाय राज ठाकरे यांना दुसरे काही जमत नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकारविरोधात रान पेटवणारे आता त्यांचीच री ओढून सरड्यासारखे रंग बदलत आहेत. राष्ट्रवादीला आणि शरद पवारांनी जातीयवादी म्हणणारे राज ठाकरे स्वत: जास्त जातीयवादी आहेत,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रविवारी प्रत्युत्तर दिले. “शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकल्यासारखे आहे,” अशी टिपणीही त्यांनी केली.


गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा अजित पवार यांनी इंदापूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना खास शैलीत समाचार घेतला.

“एकेकाळी १३ आमदारांचा पक्ष असलेला मनसेचा आता एकच आमदार आहे. बाकी नेते पक्ष सोडून का गेले? आमदारांची संख्या कमी का झाली? नुसती भाषणे करून जनतेचे प्रश्न सुटत नाहीत किंवा रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. राज ठाकरे पलटी मारणारा माणूस आहे,” असा टोमणाही अजित पवार यांनी मारला.


व्वा रं पठ्ठ्या…!

“शरद पवारांचे राजकारण बघितले तर कुठेही जातीयवादी राजकारण दिसणार नाही. त्यांनी सर्वधर्मसमभावाचे राजकारण केले. एका कार्यक्रमात मुलाखत घेतली, तेव्हा पवारसाहेब जातीयवादी नव्हते. पण, आता हा पठ्ठ्या म्हणतो, जातीचं राजकारण केलं, काय बोलावे आता,” अशा शब्दांत अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या टीकेवर टिपणी केली.

Post a Comment

0 Comments