राज ठाकरेंच्या भाषणामुळे मनसेतील मुस्लिम पदाधिकाऱ्यांची कोंडी, शांत राहण्याच्या सूचना


अहमदनगर :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच पक्षात अनेक मुस्लिम कार्यकर्ते असून ठिकठिकाणी त्यांना पदेही देण्यात आलेली आहेत. मात्र, मनसचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावरून त्यांची सध्या चांगलीच कोंडी झाली आहे. वाद वाढू नये म्हणून शांत रहावे, अशा सूचना त्यांना पक्षाकडून देण्यात आल्या असून दुसरीकडे त्यांना समाजाकडूनही दबाव येत आहे. पक्ष आणि समाज दोघांनाही टिकवून ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असल्याचे काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर आढळून आले.
राज ठाकरे यांनी जेव्हा मनसेची स्थापना केली, तेव्हा सहसा शिवसेनेकडे न दिसणारा मुस्लिम समाज त्यांच्याशी जोडला गेला. त्यावेळी मुस्लिमांबद्दल मनसेची भूमिका शिवसेनेच्या त्यावेळच्या भूमिकेपेक्षा वेगळी होती. म्हणून मुस्लिमांना मनसेमध्ये जाणे सोयीचे वाटले.
आता मात्र, मनसेची भूमिका बदलली आहे. त्यातच गुढीपाडव्याच्या मेळाव्यात ठाकरे यांनी अजानच्या भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करून मुस्लिम समाजालाच थेट लक्ष्य केल्याचे मानले जात आहे. ही भूमिका न पटल्याने काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यात मुस्लिम पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

यासंबंधी एका पदाधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आमची कोंडी झाली, हे खरे आहे. एवढी वर्षे ठाकरे यांच्यासोबत निष्ठेने राहिलो. मोठे काम उभे केले. पक्ष वाढविला. आमचाही संपर्क वाढला. सर्वच समाजात आम्हाला मनसेचे पदाधिकारी म्हणून मान आहे. आता मात्र लोक आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले आहेत. मुस्लिम समाजाकडून पक्ष सोडण्याची भूमिका घ्यावी, असे सूचविले जाऊ लागले आहे, तर अन्य समाजही भूमिकेकडे लक्ष ठेवून आहे. आम्हाला समाज आणि पक्ष दोन्ही हवे आहेत. दोघांपैकी कोणालाही नाराज करून चालणार नाही. अशा परिस्थितीत आमची कोंडी झाली आहे. मुळात ठाकरे यांनी असे बोलायला नको होते, हे आम्हालाही वाटते. त्याबद्दल मनात नाराजी आहेच. मात्र, पक्षातील नेत्यांनी काही काळ शांत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय असे व्यक्त झाल्यावर पक्षात अडचण होणार, हेही काही उदाहरणांवरून दिसून येते. त्यामुळे जाहीरपणे काहीही भूमिका सांगणार नाही. ठाकरे यांच्या दुसऱ्या सभेची प्रतीक्षा करणार आहोत, असेही या पदाधिकाऱ्याने सांगितले.

पारनेरचे माजी शहराध्यक्ष वसीम राजे म्हणाले, ‘पक्षाच्या स्थापनेपासून पक्षात आहे. अध्यक्ष ठाकरे आणि नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम केले. नगरपंचायतीच्या निवडणुकीवेळी राजकीय कारणातून मला पदावरून दूर जावे लागले. मात्र, मी पक्षासोबत कायम आहे. सध्या तरी पक्ष सोडण्याचा कोणताही विचार डोक्यात नाही. आमच्या नेत्यांनी शांत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यावर फार काही बोलायचे नाही,’ असेही वसीम राजे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या