हंगाम संपत येऊनही चीनला द्राक्ष निर्यात नाहीच; रशिया, युक्रेनची निर्यातही विस्कळीत
पुणे : राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा शेतीमाल निर्यात धोरण लकव्याचा फटाक बसला आहे. यंदाचा द्राक्ष हंगाम अखेरच्या टप्प्यात आला तरीही चीनला होणारी द्राक्ष निर्यात अद्याप सुरूच झाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. युद्धामुळे रशिया आणि युक्रेनला होणारी निर्यातही विस्कळीत झाली आहे. याचा मोठा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. समाधानाची बाब म्हणजे युरोपीयन देशांना होणारी निर्यात सुरळीत सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार म्हणाले, ‘‘यंदाचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आला, तरीही चीनला होणारी निर्यात अद्याप सुरू झालेली नाही. चीनच्या अधिकाऱ्यांनी शीतगृहांची तसेच वेष्टनासंबंधीची यंत्रणा आदींची ऑनलाइन तपासणी केली, तरीही निर्यात सुरू होऊ शकली नाही. आम्हाला अपेडाकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. रशिया-युक्रेनची निर्यातही विस्कळीत झाली आहे. रशिया, चीन, युक्रेनला लांब मण्यांच्या (सुपर, सोनाक्का, अनुष्का) आणि जम्बो (काळी) द्राक्षांची निर्यात होते. मात्र, ही निर्यात बंद असल्याने शेतकऱ्यांना यंदा लांब मण्यांच्या द्राक्षांचे दर प्रती किलो ४५-५५ रुपये इतके मिळत आहेत. निर्यात सुरू असती तर किमान १० रुपयांची वाढ झाली असती. शिवाय देशांअतर्गत बाजारातही दरात तेजी राहिली असती. द्राक्ष निर्यातीबाबत केंद्र सरकारकडून आमचा अपेक्षाभंग झाला आहे.’’
२०२०-२१ मध्ये कोरोनाचे प्रतिबंध असतानाही रशियाला २४ हजार २२८ टन, चीनला १ हजार ७०८ टन आणि युक्रेनला २५२ टन द्राक्ष निर्यात झाली होती. यंदा चीनला द्राक्ष निर्यातच झाली नाही, तर रशिया आणि युक्रेनला होणारी निर्यात घटली असून, सुमारे २५० कोटी रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे, अशी माहिती राज्याच्या कृषी विभागाने दिली आहे.
चीनकडून आयातीला मंजुरी नाही ’
मार्च महिन्यात चीनने आवश्यक ऑनलाइन तपासणी केली होती. त्याचा अहवाल चीन सरकारकडे पाठविण्यात आला होता. पण, चीन सरकारने भारतातून द्राक्ष आयात करण्याला परवानगीच दिली नाही. यंदा ही सर्व प्रक्रिया करण्यास उशीर झाला आहे. आता हंगाम अंतिम टप्प्यात असून, यापुढे चीनला निर्यात सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. भारताचा शेतीमाल चीनमध्ये येऊ नये, अशीच चीनची भूमिका दिसते. हा जागतिक व्यापार युद्धाचाच एक भाग असू शकतो,
यंदा युरोपीयन देशांना होणारी निर्यात सुरळीत सुरू आहे. ८ एप्रिलअखेर ६,९७४ कंटेनरच्या माध्यमातून ९४ हजार ३६० टन द्राक्ष निर्यात झाली आहे. नेदरलॅण्डला सर्वाधिक ६२ हजार २८४ टन, ब्रिटनला १० हजार ६८८ टन, जर्मनीला ९ हजार ५४१ टन द्राक्ष निर्यात झाली आहे. युरो आणि डॉलरमध्ये व्यवहार होत असल्यामुळे युरोपीयन देशांना होणारी निर्यात शेतकरी आणि व्यापाऱ्यांना जास्त फायद्याची असते.
0 टिप्पण्या