शरद पवार यांचा राज ठाकरे यांना टोला
औरंगाबाद : ‘‘राज्यातील एका नेत्याला आम्ही शाहू-फुले- आंबेडकर यांची नावे का घेतो असा प्रश्न पडला आहे. त्यांनी खरे तर सामाजिक परिवर्तनाबाबत प्रबोधनकारांचे साहित्य वाचले तरी त्यांना महाराष्ट्राचा इतिहास कळाला असता. ते वाचले असते तर असे प्रश्न विचारण्याची वेळ आली नसती, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी नाव न घेता राज ठाकरे यांना लगावला.
औरंगाबाद येथे ‘मुप्टा’ या शिक्षक संघटनेच्या सहाव्या अधिवेशनात ते बोलत होते. प्रत्येक संघटनेला वैचारिक आधार असतो. उपेक्षित समाजाच्या हिताची जपणूक करणाऱ्या संघटनांबाबत आस्था व आदरही असतो. अशा परिवर्तनवादी विचारांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी बांधलेली ही संघटना गेली २५ वर्षे काम करत असल्याचा आनंद असल्याचा उल्लेख करत शरद पवार यांनी शिक्षक संघटनेच्या अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर भाष्य केले.
याच अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज ठाकरे आणि राणा दाम्पत्यावर टीका केली. आता काहींना भोंगे आठवले आहेत़ राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत आहे. हुनमान चालिसा म्हणायची असेल तर आम्ही आमच्या घरात म्हणू. दुसऱ्याच्या घरात जाऊन ती म्हणण्याचा हट्ट कशाला करता, असा सवाल अजित पवार यांनी केला़
0 टिप्पण्या