राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा अनेकांनी निषेध केला आहे.
या अचानक हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असून यास जबाबदार असणाऱ्यांवर व हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. ''या हल्लामागचा सुत्रदार पोलीस शोधत आहेत. या प्रकरणात पोलिस कुठेतरी कमी पडले. पोलिसांच्या हलगर्जीपणाबाबत वरिष्ठ माहिती घेत आहेत,'' असे अजित पवार म्हणाले.
''एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर दोन दिवसांनी हा हल्ला झाला आहे, एकीकडे गुलाल उधळला, तर दुसरीकडे हल्ला करतात, एस.टी कर्मचाऱ्यांना कुणीतरी भडकवलं असावं, माध्यमांना माहिती मिळते, पण पोलिसांना का मिळत नाही,'' असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
शरद पवार यांच्या मुंबईतील 'सिल्व्हर ओक'या निवास स्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांचे वकिल ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना दीड तासाच्या चौकशीनंतर मुंबईच्या गावदेवी पोलिसांकडून शुक्रवारी (ता. ८ एप्रिल) रात्री दहाच्या सुमारास अटक करण्यात आली. इतर १०५ एसटी कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्याची कार्यवाही सुरू आहे, त्यामुळे आज शनिवारी (ता. ९ एप्रिल) त्यांच्यासह १०६ जणांना न्यायालयात उभे करण्यात येणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील याचिकेवर महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. याच निर्णयाचं एसटी कर्मचाऱ्यांकडून स्वागतही करण्यात आलं, मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल (८ एप्रिल) काही एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी धडक दिली. संतप्त कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकच्या दिशेनं दगडफेक केली. त्याचबरोबर चप्पलाही भिरकावल्या. अचानक झालेल्या या घडामोडीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
0 टिप्पण्या