मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील दिल्ली कॅपिटल्स संघावरील करोनाचे सावट गडद होताना दिसत असून बुधवारी यष्टीरक्षक-फलंदाज टीम सेइफर्टचाही करोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला. मात्र त्यानंतरही बुधवारी पंजाब किंग्जविरुद्धचा सामना ठरल्याप्रमाणेच झाला. परंतु दिल्लीचा शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामनासुद्धा पुण्याऐवजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या संघावर करोनाचे संकट आहे. दिल्लीचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांना गेल्या शुक्रवारी करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर सोमवारी अष्टपैलू मिचेल मार्श, डॉक्टर अभिजीत साळवी यांच्यासह चार जणांचा करोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे दिल्लीचा पंजाबविरुद्धचा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) स्टेडियमवरून मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हलवण्यात आला होता. बुधवारी सेइफर्टला करोनाची बाधा झाल्याने पंजाबविरुद्धचा सामना अडचणीत येण्याची शक्यता होती. मात्र दिल्लीच्या अन्य खेळाडूंचा सलग दोन करोना चाचण्यांचा अहवाल नकारात्मक आल्यामुळे सामना ठरल्याप्रमाणे झाला.
‘‘दिल्ली कॅपिटल्सच्या सदस्यांच्या बुधवारी दोन वेळा करोना चाचणी झाल्या. सर्वाचे दुसऱ्या फेरीतील करोना चाचण्यांचे अहवाल नकारात्मक आल्याने दिल्ली-पंजाब यांच्यात ब्रेबॉर्नवर होणारा सामना वेळापत्रकानुसार खेळवण्यात येईल,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सांगितले.
‘‘दिल्लीचा यष्टीरक्षक सेइफर्टचा आरटी-पीसीआर करोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे दिल्लीच्या संघातील करोनाबाधितांची एकूण संख्या सहा झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात २२ एप्रिलला पुण्यात होणारा सामना आता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येईल,’’ असे ‘बीसीसीआय’कडून सांगण्यात आले.
दिल्लीच्या संघाला मैदानात पोहोचण्यास उशीर
सेइफर्टला बुधवारी करोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आल्यावर दिल्लीच्या संघात चिंतेचे वातावरण होते. पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी खेळाडू आणि मार्गदर्शकांची पुन्हा करोना चाचणी झाली. त्यामुळे दिल्लीचा संघ साधारण साडेसहा वाजता मैदानात पोहोचला. एरवी दोन्ही संघ नाणेफेकीच्या एक तास आधी म्हणजेच सहा वाजताच्या सुमारास मैदानात येतात. पंजाबचा संघ अपेक्षित वेळेत मैदानात हजर होता. मात्र दिल्लीच्या खेळाडूंना सामन्यापूर्वी सरावासाठी फारसा वेळ मिळू शकला नाही. तसेच सामना सुरू झाल्यावर डगआऊटमधील राखीव खेळाडू व साहाय्यकसुद्धा मुखपट्टी घालून होते.
सेइफर्टला करोनाची बाधा झाल्याचे कळल्यावर आम्ही थोडे गोंधळलो होतो. आम्हाला नक्की काय सुरू आहे, हे कळत नव्हते. मात्र, आम्ही संघाच्या बैठकीत चर्चा केली आणि केवळ सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले
0 टिप्पण्या