रस्ते खोदाईमुळे लक्ष्मी रस्त्यावरील वाहतुकीचा बोजवारा

 परीक्षांच्या हंगामात गल्लीबोळांमध्ये कोंडी; विद्यार्थ्यांसह पालकांना मनस्ताप


पुणे : ऐन परीक्षांच्या हंगामात मध्यभागातील रमणबाग चौक ते लक्ष्मी रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौक दरम्यान मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू असल्याने या भागातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. लक्ष्मी रस्त्यावरील शगुन चौक ते रमणबाग चौकापर्यंतचा रस्ता बंद असल्याने लगतच्या गल्ली बोळात कोंडी होत आहे. गेल्या वर्षभरापासून या भागात सातत्याने खोदकाम करण्यात येत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 

गेल्या महिनाभरापासून या भागात मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू असून रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी, वाहनचालक तसेच पालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. रमणबाग चौकापासून पत्र्या मारुती चौकापर्यंत मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यानंतर उंबऱ्या गणपती चौक ते कुमठेकर रस्त्यावरील विश्वेवर मंदिरापर्यंत मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रमणबाग चौक ते पत्र्या मारुती चौक रस्ता दुचाकी, मोटारींसाठी खुला करण्यात आला असला, तरी वाहनचालकांना लक्ष्मी रस्त्यावर पोहोचण्यासाठी गल्ली बोळातून जावे लागत आहे. त्यामुळे भानुविलास चित्रपटगृह, विजय चित्रपटगृह, लोखंडे तालीम चौक परिसरातील गल्ल्यांमध्ये कोंडी होत आहे. दररोज सकाळी, सायंकाळी या भागात कोंडी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.


टिळक रस्त्यावरून येणारे वाहनचालक नागनाथ पार चौक, लक्ष्मी रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौकमार्गे बालगंधर्व  रंगमंदिराकडे जातात. डेक्कन जिमखानाकडे जाणारा मुख्य रस्ता बंद असल्याने वाहनचालक गल्ली बोळातून वाट काढत असल्याने कोंडीत आणखी भर पडत आहेत. त्यामुळे बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. शनिवारी, रविवारी नागरिक मोठय़ा संख्येने लक्ष्मी रस्ता परिसरात खरेदीसाठी येत असल्याने कोंडीतून वाट काढत नागरिकांना खरेदी करावी लागत आहे.


विद्यार्थी वाहतूकदारांसह पालकांना मनस्ताप


शालेय विद्यार्थी वाहतूकदारांना रस्ते खोदाईमुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वळसा मारून शाळेपर्यंत पोहोचावे लागत आहे. शाळा भरणे तसेच सुटण्याच्या वेळेस कोंडी होत आहे. परीक्षा सुरू असताना रस्ते खोदाई सुरू आहे, अशी तक्रार शालेय विद्यार्थी वाहतूक करणारे व्हॅनचालक प्रवीण जाधव यांनी केली. मध्यभागात पाच शाळा आहेत. परीक्षा सुरू असताना खोदकाम सुरू असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात आल्या.


मध्यभागात ठेकेदाराकडून रस्ते खोदाई करण्यात येत आहे. ठेकेदाराकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात येते. मात्र, प्रत्यक्ष किती दिवस काम चालणार आहे, याची माहिती देण्यात येत नाही. खोदकामामुळे मध्यभागात गेल्या काही दिवसांपासून कोंडी होत असून वाहतूक नियोजन करणाऱ्या पोलिसांवर ताण पडत आहे. गल्ली बोळात वाहतूक पोलीस नेमणे शक्य नाही. खोदाईमुळे लक्ष्मी रस्ता परिसरात कोंडी होत आहे.


– राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग

रस्ते खोदाईमुळे व्यापारावर परिणाम झाला आहे. धूळ, मातीचा त्रास व्यापाऱ्यांसह खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना होत आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लक्ष्मी रस्त्यावर खोदकाम करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा या भागात कामे सुरू करण्यात आली आहेत. गेल्या महिनाभरापासून मध्यभागातील वेगवेगळय़ा भागात खोदाकाम सुरू असल्याने कोंडी होत असून नियोजन नसल्याने सामान्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या