२०११ चा वर्ल्डकप हा तमाम भारतीयांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. तब्बल २८ वर्षांनंतर भारतानं पुन्हा एकदा क्रिकेट वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं होतं. या वर्ल्डकपच्या आठवणींसोबतच एक गोष्ट भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनावर कोरली गेली. ती म्हणजे तेव्हाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं भारतासाठी वर्ल्डकप जिंकून आणला. यासाठी धोनीच्या नेतृत्वगुणांचं कौतुक करण्यासोबतच त्याच्या कूल डोक्याचं देखील कौतुक केलं जातं. पण वर्ल्डकप जिंकल्यानंतर आता ११ वर्षांनी यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण ठरलीय त्याच वर्ल्डकप टीमचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या हरभजन सिंगनं दिलेली संतप्त प्रतिक्रिया!
सध्या आयपीएलचा हंगाम सुरू असून दिल्ली विरुद्ध कोलकाता यांच्यातल्या सामन्यापूर्वी चॅटशोमध्ये बोलताना हरभजन सिंहनं या धारणेवर नाराजी व्यक्त करतानाच संतप्त सवाल केला आहे. या कार्यक्रमात भज्जीसोबतच मोहम्मद कैफ देखील सहभागी होता. यावेळी बोलताना कैफ म्हणाला, “२०२०मध्ये श्रेयस अय्यर दिल्लीचा कर्णधार होता. त्यानं दिल्लीच्या संघाला अंतिम फेरीपर्यंत नेलं”. कैफचं हे विधान ऐकून भज्जीचा पारा हळूहळू चढू लागला होता.
“बाकीचे खेळाडू विटी-दांडू खेळत होते का?”
कैफच्या विधानावर नाराजी व्यक्त करताना हरभजन सिंगनं लाईव्ह शोमध्येच सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केली. “मला एक गोष्ट कळत नाही. श्रेयसनं टीमला फायनलपर्यंत नेलं, मग बाकीचे प्लेअर तिथे विटी-दांडू खेळत होते का?” असा खोचक प्रश्न हरभजननं उपस्थित केला.
आयपीएलनंतर हरभजन सिंगनं थेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याविषयी भूमिका मांडली. जेव्हा ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप जिंकते, तेव्हा म्हणतात “ऑस्ट्रेलियानं वर्ल्डकप जिंकला”. पण जेव्हा भारतानं वर्ल्डकप जिंकला, तेव्हा प्रत्येकजण म्हणाला, “धोनीनं वर्ल्डकप जिंकला. मग बाकीचे १० जण तिथे काय लस्सी प्यायला गेले होते का? मग गौतम गंभीरनं काय केलं? इतर खेळाडूंनी काय केलं? हा एक सांघिक खेळ आहे. जेव्हा ७ ते ८ खेळाडू चांगला खेळ खेळतात, तेव्हाच कुठे संघाला यश मिळत असतं”, असं हरभजन सिंग यावेळी म्हणाला.
२०११च्या वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध ९१ धावांची अविस्मरणीय खेळी धोनीनं केली. २७५ धावांचं लक्ष्य गाठताना धोनीनं मारलेला विजयी षटकार इतिहासात कोरला गेला. त्या सामन्यात गौतम गंभीरनं देखील ९७ धावांची खेळी साकारली होती. त्याच्याच खेळीमुळे भारतानं ३१ धावांवर २ बाद अशा अवघड परिस्थितीतून विजयासाठीचा पाया रचला होता.
0 टिप्पण्या