औरंगाबाद : करोनामुळे बंद असणारी मंदिरे आता ओसंडून वाहू लागली आहेत. गर्दीचा उच्चांक सुरू असून गेल्या सहा महिन्यांत तुळजाभवानी मंदिराचे उत्पन्न २९ कोटी ३१ लाख ५९ हजार ७७२ रुपयांवर गेले आहे. मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षांत ऑनलाइन देणगीतही वाढ दिसत असून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दर्शन शुल्क लावण्याचा निर्णयही मंदिर उत्पन्नात मोठी भर टाकणारा आहे. महत्त्वाच्या व्यक्तींकडून दर्शन शुल्कापोटी आता ५०० रुपये घेतले जात असल्याने ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत सात कोटी ८८ लाख २५ हजार ५०० रुपये दर्शन शुल्कातून मंदिर उत्पन्नात वाढले आहेत. भाविकांकडून येणाऱ्या देणग्या व स्रोत वाढल्याने पुढील वर्षांत ५० कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न जाईल असा दावा केला जात आहे.
तुळजाभवानी मंदिरातील अर्थकारणातील अनागोंदीला आता शिस्त आली असून करोनापूर्व स्थितीमध्ये जरी मंदिराचे उत्पन्न आले नसले तरी सहा महिन्यांतील देणगी व इतर उत्पन्न स्रोतातून उत्पन्नाला चांगली चालना मिळाली आहे. गेल्या पाच वर्षांतील उत्पन्नाचा ताळेबंद तपासला असता २०१७-१८ मध्ये ३५ कोटी ३९ लाख ६९ हजार रुपये एवढी रक्कम मंदिर संस्थानाकडे जमा झाली होती. पुढील तीन वर्षे साधारणत: ३४ ते ३५ कोटी रुपयांचे उत्पन्न होत असे. पण करोनामध्ये मंदिरे बंद झाली. पुजाऱ्यांचे उत्पन्नाचे स्रोत बंद झाले. तीर्थक्षेत्री असणारे अर्थकारण पूर्णत: थांबले. मंदिरे उघडावीत म्हणून आंदोलने झाली. शेवटी खूप काळजी घेत मंदिरे सुरू झाली. करोनानंतर मंदिरांमधील गर्दी वाढत गेली. ६ ऑक्टोबरपासून मंदिर सुरू झाले तेव्हापासून जमा झालेली रक्कम २९ कोटी ३१ लाख रुपये एवढी झाली आहे. तुळजाभवनी मंदिरात सिंहासन पेटी, दानपेटी, विश्वस्त निधी, तुळजाभवानी देवीच्या अंगावरील वाहिक वस्त्र, नारळ आदीबाबतच्या लिलावातूनही मंदिरास उत्पन्न मिळते. पूर्वी या लिलावामध्ये अनेक प्रकारचे घोळ घातले जात. मात्र, त्यात पारदर्शकता आणण्याचे प्रयोग करण्यात आले. जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी केलेले हे प्रयोग मधील काही वर्षे थांबले होते. कौस्तुभ दिवेगावकर जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी सशुक्ल दर्शनाची कार्यप्रणाली सुरू केली. पहिले काही दिवस विरोध झाल्यानंतर येणारे उत्पन्न खूप अधिक असल्याचे मंदिर विश्वस्त व पुजाऱ्यांच्याही लक्षात आले. ऑक्टोबर ते मार्च या कालावधीमध्ये यातून सात कोटी ८८ लाख रुपये जमा झाले.
करोनामुळे अनेक लिलाव काहीशा कमी उत्पन्नात गेले असले तरी पुढील वर्षांत यात मोठी वाढ होईल असा दावा केला जात आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बस बंद असल्या तरी मंदिरांमध्ये अलोट गर्दी आहे. खासगी वाहनांनी भाविक येत असल्याने तीर्थक्षेत्री सध्या अक्षरश: वाहतूक कोंडी आहे.
करोनानंतर मंदिरांमधील गर्दी आता वाढू लागली आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेतलेल्या सशुल्क दर्शन योजनेमुळे मंदिर उत्पन्नात मोठी भर पडत आहे. या वर्षी भाविक किती येतील याचे अंदाज नसल्याने काही उत्पन्न वाढीचे लिलाव कमी रकमेचे गेले होते. मात्र, पुढील वर्षांत मंदिराचे उत्पन्न ५० कोटी रुपयांच्या घरात असू शकेल.
0 टिप्पण्या