चांगभलं : शिक्षकांच्या सर्जनशीलतेतून जळगावात पुस्तक भिशी चळवळ


वाचनसंस्कृती टिकविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील काही सर्जनशील शिक्षकांनी मिळून सुरू केलेला भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी उपक्रम हळूहळू जिल्ह्यात लोकप्रिय होऊ लागला आहे. १५ ऑक्टोबर २०२० रोजी अर्थात वाचन प्रेरणादिनी सुरू झालेल्या या पुस्तक भिशीच्या जिल्ह्यात पाच शाखा असून, सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक पुस्तकांचा संचय आहे.


वाचकांची वानवा नाही; पण सुजाण आणि चिकित्सक वाचकांना ग्रंथांकडे आकर्षित करणाऱ्या सर्वस्पर्शी उपक्रमांची गरज होती. आजची युवा पिढी तासन् तास आभासी जगतात असते. त्यामुळे शारीरिक व्याधी, मनोविकार नकळत वाढताहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर पुस्तके ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहेत. समाजमाध्यमांतील मजकुरापर्यंत सध्या वाचन मर्यादित झाल्याने मूलभूत सकस साहित्यापासून युवा पिढी वंचितच राहात आहे. हे लक्षात घेऊनच पुस्तक भिशी उपक्रम सुरू करण्यात आला. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासह भिशीतर्फे सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांसह विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववानांचा पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.

‘वाचनानंद ते सेवानंद’ हे ब्रीद घेऊन जळगाव जिल्ह्यात प्रथमच ग्रंथप्रेमी, सर्जनशील, समविचारी शिक्षकांनी विजय लुल्हे या ग्रंथवेड्या उपक्रमशील शिक्षकाच्या आवाहनानुसार पुस्तक भिशी उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला एक शिस्त असावी, कोणीही केवळ गंमत म्हणून या उपक्रमात सहभागी होऊ नये, यासाठी अल्प स्वरूपात सभासद वार्षिक शुल्क घेतले जाते. प्रत्येक महिन्याच्या बैठकीत सर्वांसमक्ष सोडत काढली जाते. सोडतीतील भाग्यशाली सभासदाला ठरावीक रकमेपर्यंतची आवडीची पुस्तके घेण्याचे स्वातंत्र्य असते. खरेदी केलेल्या पुस्तकांचा मालकीहक्क प्राप्त झालेल्या सभासदाकडून सहयोगी सभासदांना पुस्तके वर्षभर वाचायला दिली जातात. मासिक बैठकीतच पुस्तकांचे आदानप्रदान, नवीन पुस्तक घेताना मागील पुस्तक जमा करणे, असे काम केले जाते.


अल्पावधीतच या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. लेखिका सारिका पाटील आणि उपक्रमशील शिक्षिका अरुणा उदावंत यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा येथे पुस्तक भिशीच्या दोन शाखा, समन्वयिका शमा साळी आणि सहसमन्वयिका अंजुशा विसपुते यांच्या नेतृत्वाखाली एरंडोल शाखा, समन्वयक अर्जुन साळुंके आणि सहसमन्वयक रमेश राठोड यांच्या नेतृत्वात रावेर शाखा सुरू आहे. आगामी काळात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पुस्तक भिशीची शाखा सुरू करण्यात येणार असल्याचे भिशीचे जिल्हाप्रमुख तथा समन्वयक लुल्हे यांनी सांगितले.


उपक्रम कशासाठी?

वाचनसंस्कृती टिकविण्यासाठी पुस्तक भिशी सुरू करण्यात आली. लेखक आणि वाचकांच्या अभिव्यक्तीसाठी हक्काचे व्यासपीठ देणे, वाचनातून आत्मप्रेरणा जागृत करून सर्जनशीलता फुलविणे, सभासदांची गुणसंपदा विकसित करून त्यांना सामाजिक बांधिलकी जोपासत समाजाभिमुख, सेवाभावी, नेतृत्वशील निर्लेप कार्यकर्ते घडविणे. गावात सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालये आणि ग्रामीण भागात ग्रंथालय सुरू करण्यासंदर्भात प्रोत्साहन.


विशेष उपक्रम

पुस्तक प्रकाशन सोहळा, निबंध स्पर्धांचे आयोजन, महिलांवरील अन्याय, अत्याचार तसेच आरोग्यासंदर्भातील विषयांवर चर्चासत्र, परिसंवादाद्वारे मार्गदर्शन, कर्तृत्ववान महिलांचा गौरव, कविसंमेलन, कवितावाचन. सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव. अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात सहभाग, मरणोत्तर नेत्रदानासंदर्भात जनजागृती. वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी साहित्यिक आणि तज्ज्ञांकडून मार्गदर्शन. वाचन संस्कृती विकासासाठी शालेय पातळीवर प्रश्नमंजूषा, निबंधलेखन, पुस्तक परिचय, एक व्यक्ती- एक पुस्तक भेट, लेखक- कवी- विद्यार्थी संवाद, पुस्तक प्रदर्शन, विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांवर आधारित चर्चासत्र, वाचू आनंदे उपक्रम.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या