पोलादाचे दर वाढल्याने उद्योजक आर्थिक संकटात; रशिया- युक्रेन युद्धाचा परिणाम, दुचाकी व चारचाकी वाहनेही महागणार


 औरंगाबाद :
औरंगाबाद शहरातील व्यापाऱ्यांना पोलादाच्या वाढत्या  किमतीमुळे खेळत्या भांडवलासाठी नव्याने कर्ज घेण्याची वेळ आली आहे. रशिया- युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे लागणारे स्टीलचे दर दुपटीने वाढले आहेत. पूर्वी करोना परिस्थितीमध्ये घेतलेल्या कर्जात वाढ केल्याशिवाय गंत्यतर उरले नाही. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने येत्या काळात दुचाकी व चारचाकी वाहनांच्या किमती पुन्हा वाढणार आहेत.


केवळ स्टील नाही तर या उद्योगाला लागणाऱ्या कोळशाच्या भावातही मोठी वाढ झाली आहे.  स्टील उद्योगात वापरला जाणारा मेटलर्जीकल कोळसा किंवा कोकींग कोलचे  आतंरराष्ट्रीय दर प्रतिटन २२० डॉलरवरून ५५० डॉलपर्यंत वाढलेले आहेत. त्यामुळे स्टील उत्पादनाचा खर्च तिपटी- चौपटीने वाढलेला आहे. त्याचे परिणाम सर्व क्षेत्रात जाणवील असे जालना येथील व्यापारी व्दारकाप्रसाद सोनी यांनी सांगितले. केवळ कोळसाच नाही तर रशिया व युक्रेनकडून येणारे  स्टील आणि धातू भंगारचा पुरवठाही आता विस्कळीत झाला आहे.  दुचाकी व तीन चाकी उद्योगातील सुटे भाग बनविणारे उद्योजक उमेश दाशरथी म्हणाले, ‘कोविडनंतर अनेकांनी नवी गुंतवणूक करण्याचे ठरविले होते. पण ज्या किमतीमध्ये प्रकल्प उभारले जातील असा अंदाज होता त्याची किंमत आता ६० टक्क्यांनी वाढली आहे. आता व्यवसाय नव्या अडचणीत सापडू लागला आहे. त्यामुळे दीर्घकालीन धोरण ठेवून काम करताच येत नाही. तीन ते चार महिन्याचा विचार करून नियोजन करावे लागते. त्यामुळे नव्या गुंतवणुकीपेक्षा आहे ते खर्च भागविण्यावर बहुतांश उद्योजकांचा कल आहे. औरंगाबादसारख्या स्टीलचा राष्ट्रीय सरासरीतील दहा टक्के हिस्सा वापरणाऱ्या औद्योगिक वसाहतींमध्ये परिणाम मोठा आहे.’ लोखंडी मोठय़ा पट्टय़ाच्या व्यवसायातील उद्योजक तसेच सीआयआय या औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी रमण आजगावकर म्हणाले, ‘ज्यांनी जुन्या दराने सुटे भाग करण्याचे काम घेतले होते व दर करार केले होते त्यांना आता वेळेत त्यांचे काम पूर्ण करता येत नाही. अनेकांना करोनाकाळात बँकांनी कर्ज दिले. पण त्यातून आता उद्योग चालविता येणे अवघड झाले आहे. त्यामुळे नव्याने कर्जाच्या रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

औरंगाबाद शहरात बजाज कंपनीच्या दुचाकी व तीनचाकी गाडय़ा तयार होतात. स्कोडा, ऑडीसारखी चारचाकी अलिशान गाडीही बनते. यातील दुचाकी व तीन चाकी वाहनांसाठी सुटे भाग बनिवणाऱ्या कंपन्यांमध्ये  आता अडचणी जाणवू लागल्या आहेत. याचे परिणाम आता पुढील ताळेबंद पत्रक पूर्णत: बिघडलेले असेल. क्रयशक्ती घटण्याची भीती आता व्यक्त होत आहे.

नवीन प्रकल्प रखडणार

गेल्या वर्षीच्या स्टीलच्या दरात झालेली दुप्पट दरवाढ म्हणजे ४० रुपयांचा दर ८२ रुपये होणे तसेच लोखंडी धातू पट्टीच्या श्रेणीत तो भाव ४५ रुपयांवरून ९० रुपयांपर्यंत वधारले आहेत. तर स्टील उत्पादनासाठी लागणाऱ्या कोकींग कोळशाचे भावही वाढले आहेत. रशियाचा कोकींग कोळशाच्या क्षेत्रातील व्यापार जगात दहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तेथून कोळसा येणे कमी झाल्याने स्टील उद्योगाला मोठा फटका बसला आहे. परिणामी वाहन उद्योग व नवीन प्रकल्प मार्गी लागण्यात उशीर होण्याची शक्यता आहे. ऑक्सिजन निर्मितीच्या क्षेत्रातील एका नामवंत कंपनीने औरंगाबादच्या डीएमआयसी प्रकल्पात गुंतवणूक केली. प्रकल्प उभारणीत आता किमती वाढल्याने अडचणी जाणवू लागल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या