राज ठाकरे आणि पक्षावर मी नाराज नाही. त्यांना (राज ठाकरेंना) भेटून माझं समाधान होईल, असं मनसेनेचे पुण्यातील मावळते शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. वसंत मोरे हे आज सकाळी साडेसातच्या सुमारास पुण्याहून मुंबईसाठी रवाना झाले आहेत. मोरे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत.
“राज ठाकरेंनी मला मेसेज केला भेटायला ये. मी आज त्यांना भेटायला जात आहे. तसेच मी कोणताही निर्णय घेणार नाही. मी राज ठाकरेंसोबत आणि पक्षासोबत आहे. मी माझं म्हणण मांडणार आहे,” असं वसंत मोरे यांनी राज यांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मुंबईत झालेल्या जाहीर सभेत मशीदीवरील भोंगे न काढल्यास तिथे हनुमान चालीसा लावू असे विधान केले होते. राज ठाकरे यांच्या त्या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली. त्याचाच पक्षातील पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी उघडउघड नाराजी व्यक्त केली होती. या भूमिकेमुळे वसंत मोरे यांना काही तासात शहराध्यक्ष पदावरून बाजूला केले आणि त्यांच्या जागी मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. या सर्व घडामोडी घडत असताना, वसंत मोरे यांना अनेक पक्षाकडून पक्षात येण्याची खुली ऑफर देण्यात आली होती. या सर्व ऑफर्सबाबत राज ठाकरेंना कल्पना दिल्याचे मोरे यांनी सांगितले होते.
शहरातील मुस्लिम समाजाचे सर्वाधिक वास्तव्य असलेल्या कोंढवा भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज ठाकरे यांच्या भूमिकेच्या निषेधार्थ आंदोलन करीत राज ठाकरे मुर्दाबाद,तर वसंत मोरे जिंदाबादच्या घोषणा देखील दिल्या होत्या. या सर्व घडामोडी घडत असताना, वसंत मोरे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा निरोप आला. सोमवारी शिवतीर्थ इथे साडेअकरा वाजता भेटण्यास यावे, असं वसंत मोरेंना सांगण्यात आलं. त्यानुसार आज सकाळी कात्रज येथून मुंबईच्या दिशेने रवानापूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधाताना वसंत मोरे यांनी भेटीसंदर्भातील माहिती दिली.
“राज साहेब ठाकरे आणि पक्षावर मी नाराज नाही. त्यांना माझं समाधान होईल. भेटायला ये असा त्यांचा मेसेज आला होता. त्यामुळे आज मी त्यांची भेट घेण्यासाठी जात आहे. तसेच मी कोणताही निर्णय घेणार नाही. मी राज ठाकरेंसोबत आणि पक्षासोबत आहे. मी माझं म्हणण त्यांच्यासमोर मांडणार आहे. तसेच पक्षातील काही जण कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या लोकांबद्दल राज ठाकरेंकडे तक्रार करणार आहे,” असे मोरे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या