चेन्नईचा अष्टपैलू मोईनला दुखापत
मुंबई : चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी अष्टपैलू मोईन अलीच्या पायाला दुखापत झाली असून त्याला किमान एक आठवडा मैदानाबाहेर राहावे लागणार आहे. त्यामुळे तो पुढील काही ‘आयपीएल’ सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही, अशी माहिती चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेिमग यांनी दिली.
गेल्या शनिवारी सरावादरम्यान मोईनच्या पायाला दुखापत झाली. त्याला सोमवारी पंजाबविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले. त्याच्या अनुपस्थितीत चेन्नईला ११ धावांनी पराभव पत्करावा लागला. ‘‘मोईनच्या पायाला दुखापत झाली आहे. पायाला फ्रॅक्चर नसला, तरी मोईनला तंदुरुस्त होण्यासाठी किमान सात दिवसांचा कालावधी लागेल. मात्र, तो लवकरच मैदानात परतेल अशी आम्हाला आशा आहे,’’ असे चेन्नईचे प्रशिक्षक फ्लेिमग म्हणाले.
चेन्नईच्या खेळाडूंना यंदा दुखापतींनी सतावले आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज दीपक चहरला आधी पाय आणि मग पाठीला झालेल्या दुखापतीमुळे यंदाच्या संपूर्ण हंगामातून माघार घ्यावी लागली. तसेच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज अॅडम मिल्नेलाही केवळ एक सामना खेळता आला. आता मोईनही दुखापतग्रस्त झाल्याने चेन्नईची चिंता वाढली आहे.
महाराष्ट्राचा अष्टपैलू राजवर्धन हंगर्गेकरने युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषकात केलेल्या कामगिरीच्या आधारे चेन्नईने त्याला खेळाडू लिलावात खरेदी केले. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. ‘‘हंगर्गेकर खूपच प्रतिभावान खेळाडू आहे. मात्र, त्याच्या खेळात सुधारणेला वाव आहे. त्याने संयम बाळगून खेळावर मेहनत घेत राहणे गरजेचे आहे,’’ असे प्रशिक्षक फ्लेिमग यांनी नमूद केले.
0 टिप्पण्या