हैदराबादचा चेन्नईला शह ; हंगामातील पहिल्या विजयात अभिषेक चमकला

  


इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

नवी मुंबई : डावखुरा युवा सलामीवीर अभिषेक शर्माने (५० चेंडूंत ७५ धावा) केलेल्या अप्रतिम खेळीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने शनिवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला आठ गडी आणि १४ चेंडू राखून शह दिला. नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने दिलेले १५५ धावांचे आव्हान हैदराबादने १७.४ षटकांत पूर्ण करत हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. तर चार सामन्यांनंतर गतविजेत्या चेन्नईची विजयाची पाटी कोरीच राहिली. १५५ धावांचा पाठलाग करताना सलामीवीर अभिषेक आणि कर्णधार केन विल्यम्सन (४० चेंडूंत ३२ धावा) यांनी ८९ धावांची भागीदारी रचली. मग विल्यम्सन बाद झाल्यावर अर्धशतकवीर अभिषेक आणि राहुल त्रिपाठी (१५ चेंडूंत नाबाद ३९) यांनी फटकेबाजी करत हैदराबादला विजय मिळवून दिला.


तत्पूर्वी, चेन्नईने २० षटकांत ७ बाद १५४ अशी धावसंख्या उभारली. रॉबिन उथप्पा (१५) आणि ऋतुराज गायकवाड (१६) अपयशी ठरल्याने चेन्नईची २ बाद ३६ अशी स्थिती होती. त्यानंतर मोईन अली (४८), अंबाती रायडू (२७)  यांनी चांगले योगदान दिले. अभिषेक शर्माने या सामन्यात ‘आयपीएल’ कारकीर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या