संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी पाहायला मिळत आहे.. पोटनिवडणुकीत पुरोगामी विचारातून सुरू झालेला प्रचाराचा मुद्दा हिंदूत्वाच्या वळणावर येऊन ठेपला होता. हिंदूत्ववादी विचारसरणीच्या मतदारांना आपल्याकडे खेचण्याच्या अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडी आणि भाजपा या दोन्हीकडून जोरदार प्रयत्न केला आहे.
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असताना यापूर्वी या मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणुकीत उतरलेले आणि आता भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांना भाजपने उमेदवारी दिली होती. गेले काही दिवस मविआ आणि भाजपाच्या राज्यभरातील प्रमुख नेत्यांच्या तोफा धडाडत राहिल्या. त्यामुळे आता या निकालाकडे सर्वाचेंच लक्ष लागले आहे.
मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या फेरीपर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कसबा बावडा भागातून मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव २१३७ मतांनी आघाडीवर होत्या. जयश्री जाधव यांना ४८५६ तर भाजपाच्या सत्यजित कदम यांना २७१९ मते मिळाली. दुसऱ्या फेरीत जयश्री जाधव यांना ५५१५ तर सत्यजित कदम यांना २५१३ मते मिळाली आहेत. तर तिसऱ्या फेरीमध्ये जाधव यांना ४९२८ तर सत्यजित कदम यांना २५६६ मते मिळाली आहेत. तिन्ही फेऱ्यानंतर जयश्री जाधव या ७५०१ मतांनी आघाडीवर आहेत.
चौथ्या फेरीनंतर जयश्री जाधव यांना ३७०९ तर सत्यजित कदम यांना ३९३७ मते मिळाली. तर पाचव्या फेरीनंतर कदमवाडी, जाधववाडी,भोसले वाडी या भागातून सत्यजित कदम यांनी आघाडी घेत ४१९८ मते मिळवली आहेत. मात्र पुन्हा सहाव्या फेरीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसने आघाडी घेतली आहे. सहाव्या फेरीत जयश्री जाधव यांनी ४६८९ तर सत्यजित कदम यांनी २९७२ मते मिळवली आहेत.
दहाव्या फेरीमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना २८६८ तर सत्यजित कदम यांना ३७९४ मते मिळाली आहेत. अकाराव्या फेरीत जाधव यांना २८७० तर कदम यांना २७५६ मते मिळाली आहेत. अकराव्या फेरीनंतर काँग्रेसने ८१८७ मतांची आघाडी घेतली आहे.
0 टिप्पण्या