“अन्यथा उद्या कोणीही सुरक्षित राहणार नाही”


सोमय्यांवरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

शनिवारी नवनीत राणा आणि रवी राणा यांना भेटायला खार पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेल्या किरीट सोमय्या यांच्या गाडीवर जमावानं दगडफेक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. पोलीस ठाण्यामधून बाहेर पडताना पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली. तसेच यावेळी सोमय्यांच्या गाडीचा पाठलाग करत चप्पलाही फेकल्या. या हल्ल्यामध्ये सोमय्या किरकोळ जखमी यानंतर आता राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


“राज्यातील परिस्थिती पाहिल्यानंतर सामन्य माणसाला असे वाटते की राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे असे प्रविण दरेकर आणि चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजप संघर्ष करणारा पक्ष आहे. राष्ट्रपती राजवट लावायची की नाही हे राज्यपाल ठरवतात. आम्ही ती मागणी करण्याचे काही कारण नाही. एकच गोष्ट सांगतो आम्ही लढायला तयार आहोत,” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“कालची गोष्ट मुंबई पोलिसांच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण झेड दर्जाची सुरक्षा असलेली व्यक्ती अधिकृतपणे कळवून पोलीस ठाण्यात आले होते आणि बाहेरील लोक हल्ला करण्यासाठी जमल्याचे त्यांनी सांगितले होते. हे सांगितल्यानंतरही हा हल्ला होतो याचा अर्थ एकतर हल्ल्याला पोलिसांचे समर्थन आहे किंवा पोलीस अयशस्वी झाले आहेत. झेड दर्जाची सुरक्षा असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत हलगर्जीपणा झालेला आहे. त्यामुळे पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे हा माझा आग्रह आहे. अन्यथा उद्या कोणीही सुरक्षित राहणार नाही,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


“पोलिसांसमोर दगड मारला जात आहे आणि गुन्हा दाखल करायला त्यांना भीती वाटते. अशा प्रकारे झुंडशाहीचे राज्य यापूर्वी महाराष्ट्रात पाहिले नव्हते. पण आम्ही घाबरत नाही. जशास तसे उत्तर देऊ शकतो,” असेही फडणवीस म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या