“शिवसेना ही राष्ट्रवादीची…”; आदित्य ठाकरेंनी भाजपाची ‘सी’ टीम म्हटल्यानंतर मनसेचं प्रत्युत्तर


 मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं गुढीपाडवा मेळाव्यातील भाषण चांगलंच चर्चेत आहे. या भाषणात राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेला शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते प्रत्युत्तर देत आहेत. अशातच आदित्य ठाकरेंनी साम टीव्हीच्या कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे यांनी मनसे म्हणजे भाजपाची सी टीम असल्याचा उल्लेख केला. त्यांच्या या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उत्तर दिलंय.

एबीपी माझाशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, “मला वाटतं की शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम आहे. ज्या पद्धतीने यांचा भ्रष्टाचार चालू आहे, ज्या पद्धतीने विरप्पन गँग महानगरपालिकेमध्ये सक्रीय आहे, आता हजारो कोटी रुपयांचा हिशोब ईडीला द्यायचा आहे. काय केलं, कुठे कुठे पैसे खाल्ले याचा हिशोब ईडी मागत आहे. त्यामुळे ईडीला हिशोब कसा द्यावा, यावर आदित्य ठाकरेंनी लक्ष द्यावं. आमच्याबद्दल बोलण्याची गरज नाही, आमचं काय ते आम्ही बघून घेऊ. तुमच्यावर जी ईडीला हिशोब द्यायची वेळ आली आहे, ते नीट करा तेवढंच पुष्कळ झालं,” अशी टीका संदीप देशपांडेंनी केली.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?


“आमचं हिंदुत्व वचनं पूर्ण करण्याचं आणि सेवा करण्याचं आहे. मनसेला मी टाइमपास टोळी म्हणायचो कारण ते टाइमपासच करायचे. पण आता मला बरं वाटतंय की भाजपाची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम मिळालं आहे. बी टीम एमआयएम आहे आणि सी टीम मनसे आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या