महागाईमुळे होरपळ ; घाऊक निर्देशांक १४.५५ टक्के, खर्चाची जुळवाजुळव करताना सामान्य मेटाकुटीस


 मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे, नाशिक : सातत्याने सुरू असलेली पेट्रोल-डिझेल दरवाढ, त्यामुळे वाढलेला वाहतूकखर्च आणि रशिया-युक्रेन युद्धाचा काही जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीवर झालेला परिणाम या तीन प्रमुख कारणांमुळे महागाईचा वणवा पेटला आहे. भाज्या, अन्नधान्य, खाद्यतेले, बांधकाम साहित्य अशा सर्वच अत्यावश्यक बाबींच्या दरांमध्ये वाढ झाली असून महागाईच्या झळा ‘असह्य’ पातळीवर पोहोचल्या आहेत. मार्चमध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर १४.५५ टक्क्य़ांवर गेला.

डाळी प्रतिकिलोमागे सरासरी दहा ते २० रुपयांनी महाग झाल्या असून गुळाच्या दरातही प्रतिकिलो पाच रुपयांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. खाद्यतेल दरात दोन महिन्यांत प्रतिलिटरमागे ४० ते ५० रुपयांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्या दहा ते १५ दिवसांत मुंबई, ठाणे तसेच उपनगरांमधील भाज्या आणि फळांच्या दरात दहा ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. नाशिकमध्ये सर्व फळभाज्यांनी शंभरी पार केली आहे. घेवडय़ाच्या दराने २५० रुपये प्रति किलो असा उच्चांक गाठला आहे. वाहतूक खर्च वाढल्याने फळांच्या दरातही चांगलीच वृद्धी झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलदरात निरंतर वाढ सुरू आहे. २२ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत इंधनदरात प्रतिलिटर १० रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली. इंधनदराच्या चटक्यांनी हैराण झालेल्या सर्वसामान्यांनी आता त्याचा वापर कमी केला आहे. सिमेंट, स्टील आणि इतर बांधकाम साहित्याच्या दरात ५० ते ६० टक्क्यांनी वाढ झाली असून त्याचा परिणाम घरांच्या किंमती १५ ते २० टक्क्यांनी वाढण्यावर झाला आहे.

इंधनवापरात कपात

इंधनदराच्या चटक्यांनी हैराण झालेल्या सर्वसामान्यांनी आता त्याचा वापर कमी केला आहे. १ ते १५ एप्रिल दरम्यान पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या मागणीत घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. या काळात पेट्रोलच्या विक्रीत १० टक्के आणि डिझेलच्या १५.६ टक्क्यांची घट झाली. सिलिंडरचा दर ५० रुपयांनी वाढून ९४९.५० रुपये त्याची मागणी कमी झाली असून १ ते १५ मार्चच्या तुलनेत त्यात १.७ टक्के घट नोंदली आहे.

बांधकाम साहित्यही महागले

सिमेंट, स्टील आणि इतर बांधकाम साहित्याच्या दरात ५० ते ६० टक्क्यांनी वाढ झाली असून त्याचा परिणाम घरांच्या किंमती १५ ते २० टक्क्यांनी वाढण्यावर झाला आहे. स्टीलचा दर मार्च २०२० मध्ये ४० हजार रुपये मेट्रीक टन इतका होता. तो आता ७५ हजार ते ८० हजार रुपये झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी सिमेंटचा दर प्रतिगोणी ३५० रुपये होता. आज तो ४५० रुपये झाल्याची माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या गृहनिर्माण आणि रेरा समितीचे अध्यक्ष आंनद गुप्ता यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे सिमेंट आणि स्टीलच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत अशी मागणी ‘बीएआय’कडून केली जात आहे. मात्र केंद्र सरकारने अद्यापही याबाबत कोणतीही पावले उचललेली नाहीत, असे गुप्ता यांनी सांगितले. युक्रेन-रशिया युद्धाच्या परिणामांमुळे ही वाढ झाल्याचे सांगण्यात येते.

महागाई निर्देशांकांतही वाढ

महागाईत इंधन दरवाढीचा यावेळी जवळपास दुप्पट म्हणजे ३४.५२ टक्के हिस्सा राहिला आहे. यात प्रामुख्याने खनिज तेलाची महागाई मार्चमध्ये ८३.५६ टक्क्यांवर पोहोचली. म्हणूनच या श्रेणीतील महागाईचा परिणाम इतर श्रेणीतील वस्तूंवरही दिसून येत आहे. परिणामी, भारतात व्याजदरासाठी महत्त्वाची मोजपट्टी मानला जाणारा किरकोळ महागाई निर्देशांक मार्चमध्ये ६.९५ टक्के नोंदला गेला. गेल्या १७ महिन्यांतील हा सर्वाधिक स्तर आहे. तर घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर मार्चमध्ये १४.५५ टक्के नोंदविला गेला. मात्र सरकारी आकडेवारी आणि बाजारपेठेतील वास्तव यात कायम जमीन-अस्मानाचा फरक राहिला आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे वाहतूकदारांनी भाडेदरात वाढ केली आहे. परिणामी, अन्नधान्याच्या किमतीत वाढ झाली आहे.

– राजेंद्र बाठियाअध्यक्षदी पूना मर्चंट्स चेंबर

खाद्यतेलातील दरवाढ

भारत रशिया आणि युक्रेनवरून मोठय़ा प्रमाणावर तेलाची आयात करतो. परंतु त्या दोन देशांमध्ये युद्ध सुरू असल्याने त्याचा थेट परिणाम तेलांच्या आयातीवर झाल्याने दिवसेंदिवस तेलाचे दर वधारत आहेत. तेलाच्या प्रतिकिलो दरात ४० ते ५० रुपयांची वाढ होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. सध्या सूर्यफुलाच्या तेलाचे दर प्रति लिटर १९० ते २०० रुपये आहेत. ते फेब्रुवारीत १५० रुपयांवर होते. म्हणजे दरात ४० ते ५० रुपये वाढ झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धापूर्वी पाच लिटर तेलाचे दर ७०० ते ८०० रुपये होते, ते आता हजार रुपयांवर गेले आहेत.

१५ लिटर सूर्यफूल तेलदर ५०० रुपयांनी, सोयाबीन तेलदल ६००-९००रुपयांनी, पामतेल दल ९००-११०० रुपयांनी आणि शेंगदाणा तेलदर २००रुपयांनी वाढले आहेत.  तेलाची भाववाढ आवाक्याबाहेर जात असल्याने ग्राहकांची आर्थिक कोंडी होत असून सध्या ग्राहक १५ लिटर तेलाच्या डब्याऐवजी एक लिटर किंवा पाच लिटर असे गरजेपुरतेच तेल खरेदी करीत आहेत. त्यामुळे तेलाच्या मागणीत ४० ते ५० टक्के घट झाल्याचे व्यापऱ्यांनी सांगितले. 

भारताची खाद्यतेल गरज

भारताला दरवर्षी एक कोटी खाद्यतेलाची गरज भासते. त्यापैकी २५ लाख टन सूर्यफूल तेल, तर ६०-७०लाख टन पाम तेल आयात करण्यात येते. सूर्यफूल तेलाला अधिक मागणी असते. दरवर्षी भारत ३० लाख टन सूर्यफूल तेल आयात करतो. युक्रेनवरून ७५ टक्के, रशियामधून २०टक्के आणि अर्जेटिनातून ५ टक्के सूर्यफूल तेलाची आयात करण्यात येते. सध्या सूर्यफूल तेलाच्या आयातीवर परिणाम झाला नसला तरी ते देश चढय़ा दराने विक्री करीत आहेत. परिणामी, तेलाचे दर वधारत आहेत. साधारणपणे ७० टक्के पामतेल इंडोनेशियातून आयात केले जाते. मात्र तेथील बाजारपेठेत तुटवडा निर्माण झाल्यामुळे पामतेलाची आवक कमी होत आहे. मलेशियातून २० टक्के तेल आयात केले जाते.  सोयाबीन तेलाची आयात अर्जेटिना, ब्राझील तसेच अमेरिकेतून होते. तेथील हवामानातील बदलामुळे यंदा सोयाबीनची लागवड कमी झाली असून त्याची आयात अपुरी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडींमुळे भविष्यात टप्याटप्याने तेलाचे दर वाढणार आहेत, असे पुणे मार्केट यार्डमधील खाद्यतेल व्यापारी कन्हैयालाल गुजराथी यांनी सांगितले.

रशिया-युक्रेन युद्धामुळे तेलाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. ते ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेल्याने मागणी घटली आहे. दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

खाद्यतेलातील (१५ लिटर) दरवाढ (रुपयांत

तेल                   आधी              आता                वाढ

सूर्यफूल                 २३००-२४००       २८००-२९००        ५००

सोयाबीन                १९००-२०००         २६००-२८००         ७००-८०० 

पाम                    १२००-१४००       २३००-२४००        ९०० – १०००

शेंगदाणा                 २६५०             २९३०                 २८०

नाशिकमध्ये घेवडा २५० रुपये किलो

बहुतेक सर्व फळभाज्यांनी शंभरी पार केली आहे. घेवडय़ाच्या दराने २५० रुपये प्रति किलो असा उच्चांक गाठला आहे. लहान आकाराचे लिंबू १० रुपयाने विकले जात आहे. हिरवी मिरची ८० ते १२० रुपये, हिरवा वाटाणा १२० रुपये किलोपर्यंत पोहचला आहे. बाजार समितीतही भाज्यांचे दर वाढले आहेत. यामुळे गृहिणींचे मासिक अंदाजपत्रक बिघडले आहे. दर सातत्याने वाढत असल्याने भाज्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत, असी व्यथा शुभांगी सावजी या गृहिणीने व्यक्त केली. भाजीपाला विक्रेते राहुल झवरे यांनी, बाजार समितीत एका मोठय़ा टोपलीभर भाजीसाठी ५०० रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत असल्याचे सांगितले. 

नाशिकच्या बाजारपेठेतील किरकोळ भाजीदर  : श्रावण घेवडा २५०, वाटाणा १२०, वालपापडी १००, सिमला १००, लवंगी मिरची १२०, कारले, दोडके, गिलके ८०, कोबी गड्डा २० रुपये नग, फूल कोबी ३० रुपये नग, मेथी २० ते ४० रुपये जुडी, वांगे ६० रुपये किलो, पालक २० रुपये जुडी, भेंडी ५०, गवार १२०, कोिथबीर ४०, तांदुळका २५, अळूची पाने १५ रुपये, आले २० रुपये पावशेर, टोमॅटो २० ते ३० रुपये किलो, भोपळा १५ ते २०, बीट १० रुपये नग

मुंबई-ठाण्यात भाज्या भडकल्या

इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे मालवाहतुकीचा खर्च वाढला असून त्याची परिणती जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीत झाली आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून मुंबई, ठाणे तसेच उपनगरांमधील भाज्या आणि फळांच्या दरात दहा ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुणे ते मुंबई किंवा नवी मुंबईपर्यंत भाज्यांची वाहतुकीसाठी दिवसाला दोन हजार ते अडीच हजार रुपये खर्च येत होता तर, नाशिकहून मुंबई किंवा नवी मुंबई शहरात भाज्या आणण्यासाठी मालवाहतूकदारांना ३ हजार ते साडेतीन हजार खर्च येत होता. परंतु, इंधन दरवाढीमुळे मालवाहतूकीच्या खर्चात हजार रुपयांची वाढ झाली आहे, असे वागळे इस्टेट मालवाहतूक संघटनेचे अध्यक्ष विजय यादव यांनी सांगितले. उन्हामुळे भाज्या मोठय़ाप्रमाणात खराब होत असतात. त्यामुळे या कालावधीत १० ते १५ टक्क्यांनी भाज्यांची आवक घटते आणि त्यांच्या दरात काही प्रमाणात वाढ होत असते. परंतू, यंदा दिवसेंदिवस होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे भाज्यांच्या वाहतूकीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात सरासरी २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले.

तर अवकाळी पावसामुळे आधीच फळपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आवक कमी झाली आहे. त्यात मागच्या काही दिवसांपासून सातत्याने इंधनदरवाढ होत आहे. यामुळे फळांच्या वाहतुकीच्या खर्चात चांगलीच वाढ झाली आहे. इंधनदरवाढी आधी फळांच्या एका पेटीच्या वाहतुकीसाठी १०० रुपये खर्च येत असे तो सध्या १५० रुपये येत आहे. त्यामुळे दरांतही वाढ झाली असल्याची माहिती नवी मुंबई एपीएमसीतील एस. जी. एम. फळविभाग व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष बिवराज शिंदे यांनी दिली.

मसाल्यांची आवक घटली 

मुंबई, ठाणे आणि उपनगरांमधील मसाला बाजारांमध्ये मसाला बनविण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रमुख पदार्थाची आवक  प्रामुख्याने दाक्षिणात्य राज्यांमधून मार्च ते मे दरम्यान होते. यावर्षी महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने मिरचीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. वाढत्या मागणीमुळे लाल मिरचीच्या घाऊक दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दगडफूल, धणे, खसखस लवंग, तेजपत्ता, जिरे यांची विविध राज्यातून नवी मुंबई एपीएमसी येथे आवक होत असते. मागच्या काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या इंधनदरवाढीमुळे या जिन्नसांच्या किमतीतही गतवर्षीच्या तुलनेत सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या घाऊक बाजारात विविध लाल मिरच्यांची १८० ते ५०० रुपये प्रति किलोने विक्री केली जात आहे. तर इतर गरम मसाल्यांची ९० रुपयांपासून १ हजार ४०० रुपये प्रति किलोने विक्री केली जात आहे.

भाज्यांचे दर

भाज्या             घाऊक            किरकोळ

भेंडी                ४०                    ८०

फरसबी              ७०                    १००

फ्लॉवर               १४                    ४०

गवार                ८०                    १००

कारले                ४०                    ८०

शिमला मिरची    ४५                     ८०

टोमॅटो                १८                     ३०-४०

तोंडली                ७०                     १००

वाटाणा                ५५                   १००-१२०

वांगी                  ३०                         ६०

ळांचे दर (प्रति किलो)

फळ    घाऊक                किरकोळ

चिकू    ३० ते ६०              ४५ ते ७०

डाळिंब ७० ते १५०             ८५ ते १६०

द्राक्ष    ५० ते ८५             ६५ ते ९५

मोसंबी ३० ते ६५             ४० ते ७०

संत्री    ५० ते १००             ६० ते ११०

इंधन दरवाढीचे चटके

रशिया-युक्रेन संघर्षांमुळे जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय आल्याने खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे दर गेल्या तीन महिन्यांपासून १०० डॉलरवर ठाण मांडून आहेत. गेल्या महिन्यात पाच राज्यांतील निवडणुकांमुळे इंधन वितरक कंपन्यांनी १३७ दिवस इंधन दरवाढ रोखून धरली होती. मात्र त्यांनतर पेट्रोल आणि डिझेलदरात निरंतर वाढ सुरू आहे. २२ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत इंधनदरात प्रतिलिटर १० रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे १२० आणि १०० रुपयांवर पोहोचले आहेत.

२५०रु. नाशिकमध्ये घेवडा

नाशिकमध्ये बहुतेक सर्व फळभाज्यांनी शंभरी पार केली आहे. घेवडय़ाच्या दराने २५० रुपये प्रति किलो असा उच्चांक गाठला आहे. लहान आकाराचे लिंबू १० रुपयाने विकले जात आहे, तर हिरवी मिरची ८० ते १२० रुपये, हिरवा वाटाणा १२० रुपये किलोपर्यंत पोहचला आहे.

दरहोरपळ..

भाज्या आणि फळांच्या दरात दहा ते २० टक्क्यांनी वाढ

डाळी प्रतिकिलो सरासरी दहा ते २० रुपयांनी महाग

गुळाच्या दरातही प्रतिकिलो पाच रुपयांनी वाढ

खाद्यतेल ४० ते ५० रुपयांनी महाग

बांधकाम साहित्याच्या दरात ५० ते ६० टक्क्यांनी वृद्धी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या