मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात


 मंदिरावर भोंगे लावून हनुमान चालिसाचे केले पठण

बीड:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बीडमध्ये मनसैनिकांनी मंदिरांवर भोंगे लावून हनुमान चालीसाचे पठण केले. मात्र, आंदोलन करणाऱ्या या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मनसैनिक आक्रमक झाले. जिल्हाध्यक्षांसह मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे गाठले. जरी पोलिसांनी कारवाई केली, तरी यापुढे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार मंदिरावरील भोंगे काढणार नाही, असा पवित्रा मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

मुंबईतील शिवतिर्थावर गुडी पाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालत मशिदींवरील भोंग्यावर भाष्य केले. मशिदींवरील भोंगे काढून टाकले गेले नाहीत, तर आम्हीही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. राज ठाकरे यांच्या या भूमिकेला प्रतिसाद देत राज्यात अनेक ठिकाणी मनसैनिकांनी आंदोलने केली. बीडमध्येही मनसैनिकांनी आज आंदोलन केले. मां वैष्णवी देवी मंदिर जवळ ३२ फूट हनुमान मूर्ती आहे. या ठिकाणी सकाळीच मनसैनिकांनी भोंगे लावून हनुमान चालीसा लावत आंदोलन केले. मात्र हे आंदोलन होताच पोलीस प्रशासनाने मनसैनिकांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले.

मात्र या मनसैनिकांना नंतर नोटीस बजावून सोडून देण्यात आले. मात्र पोलिसांच्या कारवाईनंतरही बीडमधील मनसैनिक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. जर मशिदींवरील भोंगे निघाले नाहीत, तर आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू, असे मनसैनिकांनी जाहीर केले आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या