नवदांपत्यासह तिघांचा बुडून मृत्यू
बीड: वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे बंधारा नजीक सेल्फीचा मोह झाल्याने सेल्फी काढत असताना बंधाऱ्यात पाय घसरून पडल्याने तिघा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली. या घटनेची माहिती कळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी जाऊन बंधाऱ्यातील मृतदेहाचा शोध घेतला. मृतदेहांना बाहेर काढून पंचनामा केला आहे. या घटनेने वडवणी तालुक्यासह बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वडवणी तालुक्यामध्ये एका खाजगी उर्दू शाळेतील शिक्षकाच्या मुलीचा विवाह काही दिवसांपूर्वी झाला होता. त्यानंतर मुलगी, जावई आणि त्यांचा एक मित्र घरच्यांना भेटण्यासाठी कवडगाव येथे आले. जेवण झाल्यानंतर जवळच असलेल्या एका नदीपात्राचा आणि त्या पाहण्याचा मोह झाल्याने त्या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी नवरा बायको आणि त्यांचा मित्र त्या ठिकाणी गेले. नदीपात्रातील मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाल्याने त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे झाले होते. याच ठिकाणी त्यांचा पाय घसरून त्या खोल पाण्यामध्ये त्या तिघा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
यामध्ये ताहा शेख ( २०,राहनार ढाकरगाव,ता. अंबड) सिद्दीकी शेख (२२,राहणार ढाकरगाव, अंबड) शहाब ( २५, ढाकरगाव ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. यावेळेस त्यांच्यासोबत दोन चिमुकले देखील होते. सुदैवाने त्या दोन्ही चिमुकल्याला कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत.
या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दीर्घ काळ प्रयत्न केल्यानंतर हे तीन मृतदेह बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आले. पोलीस कर्मचारी आल्यानंतर हे तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या घटनेमुळे मात्र गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 टिप्पण्या