'...अन्यथा मशिदीवरील भोंगे काढून फेकणार'; भोंग्यांच्या वादात करणी सेनेची उडी


 औरंगाबाद :
मशिदीवरील भोंग्यांच्या वादावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच, आता करणी सेनेने यात उडी घेतली आहे. रात्री दहा वाजेनंतर मशिदीवरील भोंगे वाजले तर, करणी सेनेच्या कार्यकत्यांनी ते तोडून फेकून द्यावे, असं करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरजपाल सिंह अम्मू यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद येथे आयोजित करणी सेना महासंमेलनाच्या वेळी ते बोलत होते. सूरजपाल सिंह यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित करत, मशिदीवरील भोंगे बंद करा अन्यथा त्याच मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा म्हणू असा इशारा दिला होता. त्यानंतर यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आता याच मुद्द्यावरून करणी सेनेकडून सुद्धा वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. मशिदींवरील भोंगे रात्री दहानंतर वाजले तर ते करणी सेनेच्या कार्यकत्यांनी काढावेत, असा इशारा सूरजपालसिंह अम्मू यांनी दिला.

तर उच्च न्यायालयही संवैधानिक संस्था असून निर्णय सर्वासाठी बंधनकारक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार देश चालतो, उच्च न्यायालयही त्याचाच एक भाग असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.


ओवेसींवर टीका...


यावेळी बोलतांना सूरजपालसिंह अम्मू यांनी एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींवर सुद्धा टीकेचे बाण सोडले. पाच मिनिटं देशातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद करा, ओवेसींना पाकिस्तानच्या सीमेवर सोडतो, असं ते म्हणाले. 'हम दो हमारे दो' हाच न्याय सर्वांसाठी असावा, असा ठरावही महासंमेलनात घेण्यात आला. लोकसंख्या नियंत्रण कायदा अमलात आणला जावा यासाठी लवकरच करणी सेना केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं सुद्धा अम्मू यांनी म्हटलं आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या