बीड : जिल्ह्यातील अंबाजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील सायगाव नजीक नंदगोपाल डेअरी जवळ लातूरहून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या क्रूझर व ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात क्रूझरमधील सहा जण जागीचं ठार झाले तर क्रूझर ड्रायव्हरचा रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की अक्षरशः महिला आणि बालकाचे धड वेगळे तुटून पडले होते.
असा झाला अपघात...
लातूर येथील आर्वी गावातून अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे कार्यक्रमासाठी जात असलेल्या गंगणे कुटूंबियांच्या क्रुझर गाडीचा ( क्र . एम.एच. २४ व्ही ८०६१ ) समोरून येणाऱ्या ट्रक ( क्र.आर.जे. ११ जी.ए .९२१० ) यांच्यात समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. हा अपघात सकाळी साडेदहा वाजता झाल्याची माहिती प्रथमदर्शनी नागरिकांनी दिली आहे. दरम्यान क्रूझर गाडीमध्ये १२ जण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
७ जण जागीचं ठार...
अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावर अक्षरशः रक्तमांसाचा सडा पडला. या अपघातात क्रुझर गाडीतील ५ महिला १ बालक जागीच ठार तर एका पुरुषाचा रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृतकांची अद्याप नावे समजू शकली नसून अपघातातील जखमींना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
हा अपघात ओव्हरटेक करण्याचा नादात झाला असल्याची माहिती देण्यात आली असून अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डिवायएसपी सुनील जायभाय,बर्दापूर चे एपीआय खरात,अंबाजोगाईचे तहसीलदार विपीन पाटील यांनी भेट दिली.
0 टिप्पण्या