अविश्वास ठरावाआधी इम्रान खान यांचं भारतप्रेम आलं उफाळून; म्हणाले, “भारतीय हे प्रचंड स्वाभिमानी…!”

 


गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा आज शेवटचा अंक रंगण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात आज पाकिस्तानच्या संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. इम्रान खान यांना पाठिंबा देणाऱ्या प्रमुख पक्षांनी पाठिंबा काढल्यामुळे आता इम्रान खान यांचं सरकार पडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अविश्वास ठराव येण्याच्या काही तास आधी इम्रान खान यांनी देशवासीयांना उद्देशून केलेल्या भाषणात भारताचं आणि भारतीयांचं कौतुक केलं आहे. भारतविरोधी भूमिकांचं समर्थन करणाऱ्या इम्रान खान यांना अचानक भारतप्रेमाचे उमाळे कसे फुटू लागले? याची चर्चा आता आंतरराष्ट्रीय संबंधाच्या जाणकारांमध्ये सुरू झाली आहे.


“भारतीय प्रचंड स्वाभिमानी आहेत”

इम्रान खान यांनी शुक्रवारी रात्री देशाला उद्देशून केलेल्या भाषणात भारताचं कौतुक केलं आहे. “मला आज दु:ख देखील होतंय आणि वाईट देखील वाटतंय. आपल्यासोबतच भारत स्वतंत्र झाला. मी इतरांपेक्षा भारताला चांगलं ओळखतो. माझे अनेक मित्र देखील आहेत. क्रिकेटमुळे मला लोकांकडून फार प्रेम मिळालं. मला वाईट वाटतंय की आरएसएसच्या विचारसरणीमुळे आपले चांगले संबंध नाही. पण मला एक सांगावंसं वाटतं की ते फार स्वाभिमानी लोक आहेत”, असं इम्रान खान म्हणाले.

“भारतावर दबाव टाकण्याची कुणाची हिंमत नाही”

“कधी कुणाची हिंमत होणार नाही की त्यांच्यावर दबाव टाकतील. कोणत्याही महासत्तेची हिंमत नाही की त्यांच्यावर दबाव टाकेल. ते असं सांगू शकत नाही की भारतानं परराष्ट्र धोरणात आम्ही जे म्हणतो, तेच बोलावं. आता तुम्ही पाहात आहात की रशियावर सध्या निर्बंध लागले आहेत. पण भारतीय म्हणतायत की आम्ही तेल आयात करू. माझं देखील हेच म्हणणं आहे. मी म्हणतो की आमचा कुणाशीही वाद नाही. मी कोणत्याही देशाच्या विरोधात नाही. मी म्हणतो की माझ्या २२ कोटी लोकांच्या फायद्याला प्राधान्य द्यायचंय. त्यानंतर मी जगभरातल्या गोष्टी ऐकायला तयार आहे”, असं इम्रान खान यावेळी म्हणाले.


देशवासीयांना आवाहन…

दरम्यान, अविश्वास ठराव आपण जिंकणार नसल्याची खात्री पटल्यानंतर इम्रान खान यांनी देशवासीयांना नवीन सरकार येईल तेव्हा देशभर शांततेत मोर्चे काढण्याचं आवाहन केलं आहे. “मी हे नवीन सरकार अजिबात स्वीकारणार नाही. मी या सरकारविरोधात रस्त्यावर उतरेन. फक्त जनताच मला सत्तेत आणू शकते आणि मी जनतेच्या मदतीनेच पुन्हा सत्तेत येईल. मी या संघर्षासाठी तयार आहे. शांततापूर्ण आंदोलनात माझ्यासोबत या”, असं इम्रान खान आपल्या संदेशात म्हणाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या