Breaking News

उष्णतेच्या लाटेने भूजल पातळी खालावण्याची भीती

 


पुणे- 
या वर्षी राज्यात यंदा पावसाळ्याच्या मोसमात समाधानकारक पाऊस झाला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातही पाऊस झाला. त्यामुळे भूजल पातळी वाढली होती. परिणामी यंदा राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात होता, पण या वर्षीच्या उष्णतेच्या अतितीव्र लाटेमुळे भूजल पातळी घटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


सध्या तरी टँकरची संख्या तुलनेत कमी आहे, पण पुढील काही दिवसांत टँकरची संख्या वाढण्याची भीती पाणीपुरवठा विभागातून व्यक्त करण्यात येत आहे.


राज्यातील अतितीव्र उन्हाळा व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. राज्यातील जनतेला पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू देऊ नका अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.


राज्यात पाण्याचा साठा जवळपास 61.11 टक्के असून नागपूर जिल्हा वगळता इतर सर्व जिह्यांमध्ये 55 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक आहे, मात्र एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातच नागपूर जिह्याचा पाणीसाठा 46.41 टक्क्यांवर गेला असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत पाण्याच्या टँकर्सच्या मंजुरीचे अधिकार प्रांत अधिकाऱयांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील टंचाईग्रस्त गावे आणि उपलब्ध असलेला पाणीसाठय़ाचा आढावा घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पाणीपुरवठा विभागातून राज्यातील पाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला तेव्हा सध्या तरी राज्यात पुरेसा पाणीसाठा असल्याचे दिसून आले.


राज्यात सध्या 60 गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. या गावातील 93 वस्त्यांवर 34 टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. गेल्या वर्षी याच महिन्याच्या सुरुवातीला 9 टँकरने पाणीपुरवठा केला गेला होता. 60 गावांपैकी 55 गावे कोकणातील असून 5 गावे ही अमरावतीमधील आहेत. विशेष म्हणजे 28 मार्च ते 4 एप्रिल या 8 दिवसांच्या काळात टँकरची मागणी अधिक वाढली आहे.


दरम्यान, गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यात याच काळात पिण्याच्या पाण्याचा साठा 48.05 टक्के होता. त्यामुळे पुण्याच्या तोंडचे पाणी पळाले होते. या वर्षी मात्र पाण्याचा साठा 68.80 टक्के इतके शिल्लक आहे.

Post a Comment

0 Comments