इंन्स्टाग्रामवर घातक शस्त्रासह स्टोरी ठेवणे तिघांना चांगलेच महागात पडलं आहे. या प्रकरणी तिघांना गुंडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अक्षय उर्फ पप्पू महादेव खोजे, ओंकार उर्फ भिकू प्रशांत ठाकूर, अक्षय देविदास चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीकडून सहा कोयते आणि दोन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. तिन्ही आरोपी इंन्स्टाग्रामवर अट्टल गुन्हेगारांना देखील फॉलो करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींनी इंस्टाग्रामवर हातात कोयते घेऊन त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढून स्टोरीवर ठेवले होते. याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या घरातून सहा कोयते आणि दोन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.
हातात कोयता घेऊन चित्रपटातील डायलॉग म्हणत आरोपी इंन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत होते. तसेच अनिकेत जाधव आणि सोमनाथ पाटोळे या गुन्हेगारांना फॉलो करत असल्याचं समोर आलं आहे. या गुन्हेगारांपैकी, पाटोळे हा कारागृहात आहे.
दरम्यान, तीनही आरोपींवर भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३)/१३५ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
0 टिप्पण्या