भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहेत. सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली गोळा केलेल्या वर्गणीचे पैसे लाटल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर त्यासंदर्भात चौकशीसाठी हे समन्स बजावण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. या मुद्द्यावरून आता शिवसेना विरुद्ध भाजपा असा नवा सामना सुरू झाला असून आज संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.
“दोघं बाप-बेटे पोलिसांसमोर जायला घाबरतायत”
सोमय्या पिता-पुत्रांना बजावण्यात आलेल्या समन्सनंतर ते दोघे घाबरल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. “पोलिसांनी काय समन्स पाठवलेत, हे मला माहिती नाही. पण जबाबासाठी समन्स पाठवल्याचं कळतंय. त्याशिवाय, आयएनएस विक्रांतच्या नावावर लोकांकडून कोट्यवधी गोळा करणारे दोघं बापबेटे पोलिसांसमोर जायला घाबरत आहेत. म्हणून ते अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात गेले आहेत. पण कर नाही तर डर कशाला ही तुमचीच भाषा आहे ना?” असा खोचक सवाल राऊतांनी केला आहे.
“देवळातल्या पेटीचाही हिशोब द्यावा लागतो”
दरम्यान, देवळात ठेवलेल्या पेटीचाही हिशोब धर्मादाय आयुक्तांना द्यावा लागतो. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनीही यांच्यावर कारवाई करायला हवी, असं राऊत म्हणाले आहेत. “तुम्ही आयएनएस विक्रांतच्या नावावर लोकांकडून पैसे गोळा केले आहेत. ५८ कोटी रुपये गोळा केले. हा पोलीस तपासाचा भाग आहे. तुम्ही पैसे गोळा केले, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. धर्मादाय आयुक्तांनी देखील यांच्यावर कारवाई करायला हवी. त्यांच्या परवानगीशिवाय असे पैसे गोळा करता येत नाहीत. देवळात पेटी ठेवता त्याचा देखील हिशोब धर्मादाय आयुक्तांना द्यावा लागतो”, असं राऊत म्हणाले आहेत.
“देश, देव आणि धर्म एकच आहे. हे देशासाठी गोळा केलेले पैसे होते. तुम्हाला त्याचा हिशोब द्यावा लागेल. तुम्ही ते पैसे गोळा करून पचवलेत आणि ढेकर दिली आहे. आता तुमचं ऑपरेशन तर करावं लागेल”, असा टोला देखील राऊतांनी लगावला.
किरीट सोमय्या अंडरग्राऊंड?
“मला वाटतं किरीट सोमय्या अंडरग्राउंड झाले आहेत. त्यांना प्रश्न विचारले जातात तेव्हा ते त्याचं उत्तर देत नाहीत. उलटे-सुलटे उत्तरं देत आहेत. तुम्ही इतरांना प्रश्न विचारता आणि जेव्हा तुम्हाला प्रश्न केले जातात, तेव्हा तुम्ही पळ काढत आहात. भूमिगत होत आहात. तुम्ही क्रांतिकारी आहात का? देशाला धोका देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घरात जाऊन अटक करायला हवी. इथे कायद्याचं राज्य आहे. कायदा यावर कारवाई करेलच”, अशा शब्दांत राऊतांनी निशाणा साधला आहे.
0 टिप्पण्या