“दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय ब्राह्मण असतात”; सुजात आंबेडकरांचं मोठं विधान

 



दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी केलं आहे. औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात एका कार्यक्रमात सुजात आंबेडकर यांनी हजेरी लावली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोग्यासंबंधी विधान केल्यानंतर सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंना सर्वात आधी अमित ठाकरेंना हनुमान चालिसा बोलायला लावा असं आव्हान दिलं होतं. दरम्यान त्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “मी अमित ठाकरेंना तुम्ही येऊन हनुमान चालिसा म्हणा असं काही वैयक्तिक निमंत्रण नव्हतं. ती एक बोलण्याची पद्दत असते. आतापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या ती बाबरी मस्जिदची दंगल असो, भीमा कोरेगावची दंगल असो. आपण हेच बघितले की दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय ब्राह्मण असतात. त्यांच्या वक्तव्यानंतर प्रवाहित होऊन दंगलीत उतरतात प्रत्यक्षात ती बहुजन मुलं असतात”.

“माझं राज ठाकरेंना एवढंच म्हणणं होते की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर बहुजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवा. जर तुम्ही स्वत:च्या मुलाला उतरवणार नसाल तर मग दुसऱ्यांच्याही उतरवू नका,” असं सुजात आंबेडकर यांनी सांगितलं.


अनेक लोकांना माझं म्हणणं पटलं असल्याचं सुजात आंबेडकर यांनी सांगितलं. तसंच ते म्हणाले की, लोकांनी बोलण्यापेक्षा मनसेमधील अनेक पदाधिकारी, मुस्लिम बांधवांनी राजीनामा देत पक्ष सोडला आहे.


“२०१४ मध्ये लोकांच्या भूकमारीचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न असे सर्व आश्वासन देऊन सत्तेत आला. पण सत्तेत आल्यावर कोणीही यावर बोलायला तयार नाही. करोना काळात सर्व आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली होती, त्यावर कुणीही बोलत नाही. असं असतानाही जर भाजपा किंवा राज ठाकरे असेच हिंदू-मुस्लिम दंगलीवर बोलत असतील तर येथील लोकांना भावनिक धर्माच्या प्रश्नांमध्ये अडकून ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचा सरळसरळ अर्थ होतो,” अशी टीका सुजात आंबेडकर यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या