Breaking News

भाजपच्या नगरसेवकाने बळकावली जमीन, ताबा सोडण्यासाठी पन्नास लाखांची खंडणी


अहमदनगर :
भाजपचे नगर शहरातील नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह सात जणांविरूद्ध जमीन बळकावण्याचा आणि ती परत करण्यासाठी पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यात नगर-औरंगाबाद महामार्गावरील पोखर्डी गावात ही घटना घडली आहे. जानेवारी महिन्यात घडलेल्या या घटनेसंबंधी तक्रारदाराने आता फिर्याद दिल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या जागेच्या मालक सुनंदा धुमाळ यांचे बंधू डॉ. प्रकाश दादासाहेब जाधव (रा. समतानगर, सावेडी) यांनी या प्रकरणी शनिवारी फिर्याद दिली आहे. ३१ डिसेंबर २०२१ ते ९ जानेवारी २०२२ या कालावधीत ही घटना घडल्याचे त्यांनी म्हटले आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात नगरसेवक शिंदे, सचिन रोहिदास शिंदे, अनिल ढवण (रा.वैदुवाडी, सावेडी) व इतर पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोखर्डी शिवारात सुनंदा धुमाळ यांच्या मालकीची ९ गुंठे जागा आहे. आरोपींनी या जागेला अनधिकृतपणे तारेचे कंपाउंड केले. तेथे ‘स्वप्निल’ या नावाचा फलक लावला. मालकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी हे अतिक्रमण असल्याचे सांगितले. त्यावर ते काढून काढण्यासाठी आरोपींनी ५० लाख रुपयांची मागणी केली. त्यावरून त्यांना दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments