संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना टोला
गेल्या काही दिवसांमध्ये विरोधकांना दडपशाही मार्गाने संपविण्याचे प्रयत्न राज्य सरकारने केले असून राज्यात अशी परिस्थिती कधीच नव्हती. सरकारने विरोधकांशी संवादच संपविल्याने सर्वपक्षीय बैठकीवर भाजपने बहिष्कार टाकला असून आता संघर्षच करणार असल्याचं प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. दरम्यान फडणवीसांच्या टीकेला शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“नरेंद्र मोदी नेतृत्व करत असलेल्या भाजपाचे महाराष्ट्रातील नेते लोकशाहीवर प्रवचन देत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. शऱद पवारांनी काल सरकार पुन्हा सत्तेत येऊ शकलं नाही त्यामुळे जी अस्वस्थता आहे त्यातून विरोधी पक्षाच्या लाऊडस्पीकरमधून वक्तव्यं बाहेर पडत आहेत असं सांगितलं आहे. देशात कोणत्या प्रकारचं वातावरण आहे, केंद्रीय तपास यंत्रणांचा विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ज्या पद्धतीने वापर केला जातो, न्यायालयांवर दबाव आणला जातो, विरोधी पक्ष अनेक राज्यांमध्ये कशाप्रकारे दहशतीखाली आहे याबाबत, मानवी हक्कांसंदर्भात जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे ते कोणत्या हिटलशाहीविषयी बोलत आहेत हे समजून घ्यावं लागेल,” असं संजय राऊत म्हणाले.
“राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना लोकशाहीची इतकी चिंता आहे तर त्यासंदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करु आणि त्यांनी भूमिका मांडली आहे ती फक्त महाराष्ट्रापुरती नसून राष्ट्रीय स्तरावरची असू शकते. कारण संपूर्ण देशात हुकुमशाही निर्माण झाली आहे का अशी चिंता सर्वांनी व्यक्त केली आहे. त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला असेल. आम्ही त्यांच्याशी बोलू,” असंही संजय राऊत म्हणाले.
“महाराष्ट्रात जे उद्धव ठाकरे, शरद पवारांना ओळखतात त्यांना इतकं लोकशाहीवादी सरकार संपूर्ण देशात नाही हे कळेल. विरोधकावंर हल्ले म्हणजे काय…कोणी एखादा माथेफिरु, वेडा स्वत:वर हल्ला झाला म्हणून ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि राष्ट्रपती राजवट लावा सांगत असेल तर अशा मूर्खपणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे,” असं सांगत संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला.
पुढे ते म्हणाले की, “उत्तर प्रदेशात गेल्या तीन महिन्यात १७ खून आणि बलात्कार झाले आहेत. हिटलरशाही, हुकूमशाही, कायदा सुव्यवस्था कोसळणं काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आसाम सरकारने गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांना नरेंद्र मोदींबाबत ट्वीट केल्याप्रकरणी अटक करुन सुटका कल्यानंतर पुन्हा अटक केली. हे नेमकं कोणत्या लोकशाहीचं लक्षण आहे यावरही फडणवीसांनी मनमोकळं केलं पाहिजे. कारण त्यांना ही लोकशाहीची उबळ आली आहे ती राष्ट्राच्या हिताची आहे”.
“परत सत्तेत येऊ शकले नाहीत याची अस्वस्थता असून पुढील २५ वर्ष पुन्हा येण्याची शक्यताही नाही. अशांत मन असेल तर त्यांनी आपल्या देवघरात हनुमान चालिसा वाचून मन शांत करावं,” असा सल्ला यावेळी भाजपा नेत्यांना दिला.
चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना जशास तसं उत्तर देण्यास सांगितलं असल्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, “नक्कीच भाजपाने जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. जर या देशात कोणी लोकशाहीवर, विरोधकांवर हल्ला करत असेल तर जशास तसं उत्तर देऊन लोकशाहीचं रक्षण करणं गरजेचं आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना काही चुकीची माहिती दिली असेल तर मी त्यांच्याकडे योग्य माहिती पाठवेन. देशात अनेक ठिकाणी विरोधकांवर हल्ले होत असून तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. त्यामुळे याविरोधात राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी पुढाकार घ्यावा”.
“फडणवीस लोकांची दिशाभूल करत आहेत. हनुमान चालिसा म्हटली म्हणून राजद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला नाही. ते वकील आहेत. मुंबई हायकोर्टाने दिलेला आदेश त्यांनी वाचला पाहिजे. तुम्हीदेखील मन अशांत असल्याने घऱात हनुमान चालिसा म्हटली पाहिजे. दुसऱ्याच्या घरात घुसून परिस्थिती बिघडवणार असाल तर गुन्हा दाखल होणार,” असं संजय राऊत म्हणाले.
सर्वपक्षीय बैठकीला मुख्यमंत्री अनुपस्थित असल्यासंबंधी विचारलं असता राऊत म्हणाले की, “त्या बैठकीला मुख्यमंत्र्यांची गरज नव्हती. तो गृहखात्याचा विषय होता. पण विरोधकांना उगाच खाजवण्याची सवय आहे. अशाने एक दिवस त्यांची चामडी, बुरखे फाटणार आहेत. त्यांना फार खाजवत बसू नये. कायदा सुव्यवस्थेसंदर्भात राज्य सरकार काही चर्चा करत असेल तर त्यात सहभागी होऊन आपण आदर्श विरोधी पक्ष असल्याचं दाखवलं पाहिजे. भोंग्यासंदर्भात तुमचीच मागणी होती. आम्ही आता ते केंद्रावर सोपवलं आहे. जर अशा बैठकांमध्ये राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष जाणुनबुजून बहिष्कार टाकत असेल तर त्यांचे मनसुबे चांगले नाहीत आणि त्यांना राज्यात फक्त गदारोळ, अराजक निर्माण करुन राज्य अस्थिर करायचं आहे. आणि यालाचा राजद्रोह म्हणतात. भाजपाच्या भाषेत अशा प्रकारचा राजद्रोह केल्याबद्दल उत्तर प्रदेशसहित अनेक राज्यांमध्ये भाजपा सरकारने संबंधित व्यक्ती आणि पुढाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत”.
उद्धव ठाकरे यांनी आमचं हिंदुत्व घंटाधारी नसून गदाधारी असल्याचं म्हटलं आहे. त्यासंबंधी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “विरोधी पक्ष स्वत:च्या घंटा वाजवत बसला आहे. त्यांनी त्या वाजवत बसाव्यात. आमच्या हातातील गदा योग्य वेळी फिरेल आणि ज्यांच्या डोक्यावर आपटायची आहे त्यावर आपटली जाईल”.
0 टिप्पण्या