इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : चेन्नई-हैदराबाद आज आमनेसामने


 नवी मुंबई :
चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद हे संघ शनिवारी ‘आयपीएल’मध्ये आमनेसामने येणार असून दोन्ही संघांचा हंगामातील पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल. चेन्नई आणि हैदराबाद या संघांनी यंदाच्या हंगामातील सुरुवातीचे अनुक्रमे तीन आणि दोन सामने गमावले आहेत. चेन्नईला यंदा अपेक्षित कामगिरी करता आलेली नसून विशेषत: त्यांनी फलंदाजीत निराशा केली आहे. दुसरीकडे, हैदराबादच्या संघाला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांत आपला खेळ उंचवावा लागणार आहे.

 ऋतुराजवर नजर 

चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने ‘आयपीएल’च्या गेल्या हंगामात सर्वाधिक ६३५ धावा फटकावल्या होत्या. यंदा मात्र पहिल्या तीन सामन्यांत मिळून त्याला दोन धावा करता आल्या आहेत. त्यामुळे ऋतुराजच्या कामगिरीत सुधारणा गरजेची आहे. चेन्नईच्या फलंदाजीची त्याच्यासह मोईन अली, रॉबिन उथप्पा, कर्णधार जडेजा, शिवम दुबे, महेंद्रसिंह धोनी यांच्यावर भिस्त आहे. गोलंदाजीत अनुभवी ड्वेन ब्राव्हो आणि फिरकीपटू मोईन, जडेजा महत्त्वाची भूमिका बजावतील.

  विल्यम्सनवर भिस्त 

हैदराबादच्या फलंदाजीची कर्णधार केन विल्यम्सनवर भिस्त असेल. तसेच एडिन मार्करम, राहुल त्रिपाठी आणि निकोलस पूरन यांनी प्रत्येकी एक अर्धशतक झळकावले असून त्यांचे कामगिरीत सातत्य राखण्याचे ध्येय असेल. गोलंदाजीत ऑफ-स्पिनर वॉशिंग्टन सुंदरला भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन आणि उमरान मलिक या वेगवान त्रिकुटाची साथ लाभेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या