चंद्रा- दौलतच्या प्रेमकहाणीत ‘तिची’ एंट्री; बहुचर्चित ‘चंद्रमुखी’चा ट्रेलर प्रदर्शित


अभिनेत्री अमृता खानविलकरची मुख्य भूमिका असलेला ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट मागच्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहताना दिसत आहेत. एवढंच नाही तर आतापर्यंत प्रदर्शित झालेलं या चित्रपटाचं प्रत्येक गाणं प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरबाबत तर प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर आता प्रदर्शित झाला असून त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.


एक ध्येयधुरंदर विवाहित राजकारणी जो समाजात काही सकारात्मक बदल आणू पाहात आहे. तो मोहमयी सौंदर्य, घायाळ करणाऱ्या अदा आणि बहारदार नृत्याने अनेकांना वेड लावणाऱ्या सौंदर्यवतीच्या म्हणजेच ‘चंद्रा’च्या प्रेमात पडतो. तेव्हा त्याच्या राजकीय कारकिर्दीवर होणारा परिणाम आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यात येणारी वादळे आपल्याला ट्रेलरमध्ये दिसत आहेत. चंद्रा, दौलतराव आणि दमयंती यांच्या प्रेमाचा हा त्रिकोण पुढे कोणत्या वळणावर जाणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे.

दरम्यान ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाल्यानंतर यातून एक नवीन व्यक्तिरेखा आपल्या समोर आली आहे, ती म्हणजे सौभाग्यवती दमयंती दौलतराव देशमाने हिची. ही भूमिका मृण्मयी देशपांडे साकारणार असून हा प्रेमाचा त्रिकोण असल्याचा ट्रेलरवरून अंदाज येतोय. चंद्रा आणि दौलतराव यांच्या हळुवार खुलत जाणाऱ्या प्रेमकहाणीत दमयंतीच्या येण्याने नाट्यमय ट्विस्ट येणार का, की त्यांची प्रेमकहाणी अशीच अबाधित राहणार, याचे उत्तर आपल्याला २९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात मिळणार आहे.


‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात दमदार दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. दरम्यान ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या