नवी मुंबई : सलामीच्या सामन्यातील पराभव मागे सारत दुसऱ्या सामन्यात विजयाची नोंद करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स संघाचे सातत्यपूर्ण कामगिरीचे ध्येय असून सोमवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये त्यांच्यापुढे सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असेल. या सामन्यात लखनऊच्या फलंदाजांच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल.
कर्णधार राहुल आणि त्याचा सलामीचा साथीदार डीकॉकने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली. २११ धावांचा पाठलाग करताना या दोघांनी १० षटकांतच ९९ धावांची सलामी दिली. राहुल ४० धावा करून बाद झाला, पण डीकॉकने अर्धशतक झळकावले. त्यामुळे त्यांच्याकडून पुन्हा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्यांना चेन्नईविरुद्ध २३ धावांत नाबाद ५५ धावा करणारा तडाखेबाज फलंदाज लेविस, दीपक हुडा आणि युवा आयुष बदोनी यांची साथ लाभेल. गोलंदाजीत त्यांची आवेश खान आणि लेग-स्पिनर रवी बिश्नोई या युवा भारतीयांवर भिस्त असेल.
* कामगिरीत सुधारणा गरजेची
राजस्थानविरुद्ध सलामीच्या लढतीत हैदराबादने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांत निराशाजनक कामगिरी केली. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने टिच्चून मारा केला, पण त्याला केवळ एक बळी मिळवता आला. त्याच्यासह टी. नटराजन, उमरान मलिक आणि वॉशिंग्टन सुंदर या गोलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा गरजेची आहे. फलंदाजीत दक्षिण आफ्रिकेच्या एडिन मार्करमने अर्धशतकी योगदान दिले. त्याला कर्णधार विल्यम्सन, निकोलस पूरन आणि राहुल त्रिपाठी यांची साथ मिळणे गरजेचे आहे.
0 टिप्पण्या