महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागणार का?


अजित पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले “रुग्णसंख्या लक्षात घेता…”

करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने टास्क फोर्सने सूचना केल्यास पुन्हा एकदा निर्बंध लागू केले जाऊ शकतात असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मैदानावर महाराष्ट्र दिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी निर्बंधांसंबधी भाष्य केलं. तसंच औरंगाबाद येथील सभेला परवानगी देताना काही अटी घालून दिल्या आहेत. त्याचं पालन संबधितांनी करावं, जेणेकरून वातावरण चांगलं राहील असं म्हणत राज ठाकरेंवर निशाणा साधला. तसंच महाराष्ट्रात उष्णतेची लाट असून दोन, तीन दिवस ती कायम राहील. दुपारी उन्हात जायचं असेल तर छत्री वापरा असा सल्ला दिला.

“करोना रुग्णसंख्या वाढत असल्याची मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. मास्क वापरण्यासाठी पुन्हा सांगायचं का यावरही चर्चा झाली. सध्या लोकांना आवाहन केलं असून ऐच्छिकच ठेवलं आहे. टास्क फोर्सचाही सल्ला घेतला जात असून तज्ज्ञांशी चर्चा केली जात आहे. जर रुग्णसंख्येचं प्रमाण वाढू लागलं आणि टास्क फोर्सने सूचना केल्या तर काही बंधनं लागू करु शकतो,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

“तुमच्या माध्यमातून अनेक बातम्या समोर येत असून त्यादृष्टीने पोलीस दल सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवून आहे. एक गोष्ट खरी आहे की, अलीकडच्या काळामध्ये अनेक भागात तलवारीचा साठा सापडला आहे. यावर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसंच यातून विध्वंसपणा वाढवण्याचा काहींचा प्रयत्न दिसतोय. त्याच्या खोलामध्ये जाण्यास सांगितलं आहे. हे आताच्या काळात का सापडत आहे? यामागील मास्टरमाईंड कोण आहे? हे शोधण्यास सांगितले असून ते शोधून काढतील. पोलीस सक्षम आहेत,” असं अजित पवारांनी सांगितलं.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “सभा होत आहेत त्यानिमित्ताने एकच सांगतो की, जातीय सलोखा ठेवणं आणि महाराष्ट्रामध्ये वातावरण कुठेही खराब होणार नाही हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कोणीही आपले विचार मांडत असताना, स्वतःची मत मांडत असताना त्यामधून समाजामध्ये तेढ निर्माण होईल, कुठं तरी कोणाच्या भावना भडकावल्या जातील, तसंच वातावरण खराब होईल असं कोणी वक्तव्य करू नये आणि तसं वागूदेखील नये”.

आज राज्यात बुस्टर डोस सभा आणि राज ठाकरेंची सभा होत आहे. त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, “बुस्टर डोस सभा आणि राजसभा ही तुम्हीच नावं पाडली आहेत. असं काही नसतं, प्रत्येकाला आपले विचार मांडायचा अधिकार आहे. कदाचित महाराष्ट्र दिनानिमित्त या सभा आयोजित केल्या असतील, परंतु सभाना परवानगी देत असताना. त्या त्या भागातील संबधित अधिकारी देत असतात. तसंच औरंगाबाद येथील सभेला परवानगी देताना काही अटी घालून दिल्या आहेत. त्या अटींचं पालन संबधितांनी करावं, जेणेकरून वातावरण चांगलं राहील”.

“बारामतीमध्ये सिह किंवा वाघ सफारी सुरु करण्याचा माझा प्रयत्न”

बारामतीमध्ये बिबट्या तसंच लांडगा सफारी सुरु करण्याचं नियोजन असल्याच्या चर्चेसंबंधी विचारलं असता अजित पवार मिश्कीलपणे म्हणाले की, “काहीही बातम्या आहेत. लांडगा सफारी…आता लांडगा कोण बघायला येणार आहे. कोल्हे बघायला येतील. अजून त्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही”.

“बारामतीमध्ये बिबट्या सफारी होणार असं आम्ही कधीच म्हटलं नव्हतं. तुम्हीच सर्व देत आहात. मी जुन्नर येथे गेलो होतो. तिथे टीमने आढावा घेतला आहे. आता आम्ही आदित्य ठाकरे आणि तेथील लोकप्रतिनिधींशी एकत्रित चर्चा करणार आहोत. तिथे बिबट्या सफारी करण्याबाबत तरतूद करून काम पूर्ण करणार आहे. तसंच बारामतीमध्ये सिंह किंवा वाघ सफारी सुरु करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या