शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशात उपस्थित होणाऱ्या वादग्रस्त विषयांवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. देशात काही काळ वादग्रस्त विषय दूर ठेवावे लागतील, नाहीतर श्रीलंकेत राष्ट्रपती, पंतप्रधान पळून गेलेत ती स्थिती भारतात निर्माण होईल, असा गंभीर इशारा संजय राऊत यांनी दिला. यावेळी त्यांनी राम मंदिरासाठी दोन्ही बाजूंनी हजारो लोकांनी प्राण गमावले आणि रक्ताच्या नद्या वाहिल्याचंही नमूद केलं. ते आज (१२ मे) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “अयोध्येच्या आंदोलनात दोन्ही बाजूने हजारो लोकांनी प्राण गमावले आहेत. रक्ताच्या नद्या वाहिल्या आहेत. त्यानंतर आता राम मंदिर उभं राहत आहे. राम मंदिर आमच्या सर्वांच्या अस्मितेचा विषय होता. ते उभं राहत आहे. त्यामुळे आता देशात महागाई, बेरोजगारी, राष्ट्रीय सुरक्षा या विषयाकडे पाहणं गरजेचं आहे.”
“इतिहासात रुपया इतका खाली घसरला नव्हता”
“या देशाचा रुपया ७७ रुपये प्रति डॉलर इतका खाली घसरला आहे. इतिहासात रुपया इतका खाली घसरला नव्हता. देशाची अर्थव्यवस्था कोसळली आहे. लोकांना नोकऱ्या नाहीत, महागाईशी सामना करता येत नाही. राज्यकर्ते आणि सर्व पक्षांनी यावर बोलणं गरजेचं आहे,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
“वादग्रस्त विषय दूर ठेवा, नाहीतर श्रीलंकेत राष्ट्रपती, पंतप्रधान पळून गेले…”
“काही काळ वादग्रस्त विषय दूर ठेवलं पाहिजे. नाहीतर श्रीलंकेत जी स्थिती आहे तशी भारतात येईल. श्रीलंकेत जसं राज्यकर्त्यांना रस्त्यावर धरून बदडलं, राष्ट्रपती, पंतप्रधान पळून गेलेत, त्यांच्या घरांना आगी लावल्या आहेत ही परिस्थिती येऊ नये असं वाटत असेल तर राज्यकर्ते आणि राजकारण्यांनी लोकांच्या प्रश्नावर बोलावं,” असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.
0 टिप्पण्या