अवघ्या ६ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार


दारुच्या नशेत नराधमाकडून कृत्य

बीड : गेल्या काही दिवसांपूर्वीच बीड आणि परळीत घडलेली सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा जिल्ह्यात ६ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री १२ च्या दरम्यान घरातून उचलून नेऊन ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला. ही धक्कादायक घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील रामपुरी गावात उघडकीस आली आहे. सुंदर तायड वय २५ रा. रामपुरी असं नराधम आरोपीचं नाव आहे.

आरोपी सुंदर तायड याने बुधवारी रात्री ११ च्या दरम्यान, पीडितेच्या घराबाहेर चकरा मारत होता. यादरम्यान त्याला पीडितेच्या आईने घराजवळून हाकलून दिले. मात्र, मध्यरात्री १२ च्या दरम्यान नराधम आरोपी सुंदर, पुन्हा दारूच्या नशेत असल्यामुळे पीडितेची आई घराजवळील आपल्या भावाला झोपेतून उठविण्यासाठी गेली असता सुंदरने पीडित ६ वर्षीय चिमुरडीला घरातून उचलून अज्ञातस्थळी नेले. त्यानंतर त्या चिमुरडीवर अत्याचार करून तो फरार झाला. याप्रकरणी रात्री उशिरा बीडच्या तलवाडा पोलीस ठाण्यात, ३७६ व पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच बीडच्या बेलूरा गावात सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसात परळीत देखील सामूहिक बलात्काराची घटना घडली. या दोन्ही घटना ताज्या असतानाच, आता पुन्हा एकदा ६ वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराची घटना घडल्याने, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, यामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून खाकीचा धाक संपला आहे का ? असा प्रश्न उपस्थित होतो. विशेष म्हणजे महिला आयोगाच्या सदस्यादेखील बीड जिल्ह्यातीलच आहेत. मात्र, त्यांच्याकडून देखील आवाज उठवला जात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या