“आजची सभा आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप आहे”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आज(शनिवार) सायंकाळी एमएमआरडीए मैदान, बीकेसी, वांद्रे पूर्व येथे जाहीर सभा होणार आहे. आजच्या सभेत उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधणार आणि राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या सभेला उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून शिवसेना कार्यकर्ते येणार आहेत. दरम्यान या सभेबद्दल शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना माहिती दिली. “आजची सभा ही क्रांतिकारी सभा असेल, आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप अशी ही आजची सभा असणार आहे. या सभेतून सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील.” असं त्यांनी सांगितलं.
माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, “ही सभा आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप आहे. मुंबईत कोविडच्या काळानंतर इतक्या मोठ्या सभा झालेल्या नाहीत. शिवसेनेच्या मुंबईतील सभांची परंपरा विराट, अतिवराट अशी आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अशाप्रकारच्या जाहीर सभेला प्रथमच व्यासपीठावर येतील. आपण जर आजच्या सभेचं व्यासपीठ पाहाल तर आतापर्यंत इतकं मोठं व्यासपीठ हे मुंबईत निर्माण झालेलं नव्हतं. अशाप्रकारचं हे भव्य व्यासपीठ आहे. शिवसेनेचा संपूर्ण कारभार भव्य असतो. आज मैदानात उतरण्याच्या निश्चयाने, जिद्दीने या सभेचं आयोजन आहे.”
फक्त इथे भगव्या रंगाचाच धनुष्य आकाशात तुम्हाला दिसेल
तसेच, “मागील दोन-अडीच वर्षांपासून महाराष्ट्रातील, मुंबईतील आमचे हजारो, लाखो शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाची वाट पाहत होते. मागील दोन वर्षांत उद्धव ठाकरे यांनी अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला होता. बैठका घेतल्या पण विराट जाहीर सभा ही प्रदीर्घ काळानंतर होत आहे. महाराष्ट्रातील, देशातील राजकीय वातावरण आणि या वातावरणावर आलेला एक मळभ, धुकं, गढूळपणा हे आजच्या सभेने खासकरून उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने पूर्णपणे दूर होईल आणि महाराष्ट्राचं आकाश निरभ्र होईल. फक्त इथे भगव्या रंगाचाच धनुष्य या आकाशात तुम्हाला दिसेल.” असं संजय राऊत म्हणाले.
काही लोकांची जी जळजळ आहे, त्यावर आजच्या सभेने योग्य उपचार केले जातील
तर, “अर्थात हे राज्य, हा पक्ष हा पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच आणि बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेने चाललेला आहे. काही लोक हे राज्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक प्रश्न निर्माण केलेत, काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही जी पोटदुखी आहे, ही जी काही लोकांची जळजळ आहे. त्यावर मला असं वाटतं आजच्या सभेने योग्य उपचार केले जातील.” असंही संजय राऊतांनी बोलून दाखवलं.
हा आमचा मास्टरब्लास्टर डोस असेल
भाजपाच्या बुस्टर डोस सभेवरून निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले, “कोणाचा बुस्टर डोस मला माहीत नाही. हा आमचा मास्टरब्लास्टर डोस असेल, आमची फटकेबाजी असते. आम्ही मास्टरब्लास्टर आहोत. शिवसेना व गर्दी यांचं एक नातं आणि समीकरण आहे. आम्हाला गर्दी जमावावी लागत नाही. आम्हाला गर्दी आणावी लागत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हिंदुत्वाचा विचार आहे. आमचा मराठी माणसासंदर्भातील विचार आहे. महाराष्ट्रच्या स्वाभिमानासंदर्भातील विचार आहे, विकासासंदर्भातील विचार आहे. यामुळे शिवसेनेचं एक लोहचुंबक आहे विचारांचं, लोक आपोआप जमतात. खासकरून आज उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची एक उत्सुकता ही महाराष्ट्र आणि देशाला आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल अशाप्रकारची ही सभा आहे.”
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हेच होते आणि राहतील
याचबरोबर “हिंदुहृदयसम्राट हे बाळासाहेब ठाकरे हेच होते आणि राहतील आणि आहेत. बाकी आम्ही सगळे हिंदुंचं संघटन करत आहोत आणि त्यांना लढण्याची प्ररेणा देत आहोत. हिंदुजननायक कोण?, महानायक कोण? हे प्रश्न या देशात उपस्थित होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. बाळासाहेब ठाकरे हेच हिंदुहृदयसम्राट आणि लोकांच्या हृदयात त्यांचं स्थान राहील.” असं देखील संजय राऊत यांनी यावेळी बोलून दाखवलं.
0 टिप्पण्या